कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या पंखांना ‘भविष्यवेध’चे बळ


 करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात 


चिपळूण :  कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न ‘कुणबी युवा मुंबई’ (शिक्षण विभाग)  यांच्या वतीने रविवार, १९ एप्रिल रोजी परळ येथील कुणबी  वाघे हॉल मध्ये ‘भविष्यवेध: करिअर मार्गदर्शन शिबिराचे'  आयोजन करण्यात आले होते.  या शिबिराला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



 ठाणे येथील संबोधी करिअर अकॅडमीचे संचालक  मंगेश बोरकर  यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी केवळ पारंपरिक पदवी शिक्षणावर मर्यादित न राहता UPSC, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षा, आधुनिक क्षेत्रांतील करिअर संधी आणि व्होकेशनल कोर्सेसची सविस्तर माहिती दिली. "मुलांच्या आवडीनुसार करिअर निवडताना पालकांनी त्यांना दडपण न देता पाठबळ द्यावे," असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 


प्रश्नोत्तरांच्या सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे अत्यंत सोप्या भाषेत निरसन केले.


 कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षा  दिपिका आग्रे  यांनी  विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कुणबी युवा मुंबईचे  युवाध्यक्ष  युवराज कांबळे यांनी आपल्या मनोगतातून तरुणांना संघटित होऊन प्रगती करण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन शिक्षण विभागाचे प्रमुख  निलेश कुळये यांनी केले.  शिक्षण विभागाचे सदस्य शशांक रांगळे  यांनी उपस्थितांचे आभार मानले.