चिपळुणात ठाकरे सेनेची पालिकेवर धडक 

अपूर्ण कामांवरून प्रशासनाला विचारला जाब, आंदोलनाचा दिला इशारा

चिपळूण : शहरातील प्रलंबित कामे, प्रशासनाची ढिलाई आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजी कारभाराविरोधात ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पालिकेवर धडक दिली. शहरप्रमुख भैया कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी संजय जाधव यांची भेट घेत निवेदनांच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारला.

मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करताना पदाधिकारी म्हणाले, बहादुरशेख नाका टेलिफोन एक्सचेंज ते वांगडे मोहल्ला उर्दू शाळा दरम्यानचा मंजूर रस्ता मुद्दाम अर्धवट ठेवला आहे. या रस्त्यामुळे नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावर जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने कानाडोळा केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शहरात महानगर गॅस कंपनीकडून टाकण्यात आलेल्या पाईपलाईननंतर रस्त्यांवर उघडेच ठेवलेले खड्डे हा नागरिकांच्या जीवाशी थेट खेळण्याचा प्रकार आहे. कंपनीने आगाऊ रक्कम भरूनही पालिकेकडून दुरुस्ती न होणे ही गंभीर निष्काळजीपणाची बाब असून तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी केली.
“रम्बलर स्ट्रीप” कामातील गंभीर दिरंगाईचा मुद्दा उपस्थित करत, करारनामा व कामाचे आदेश देऊनही संबंधित ठेकेदाराकडून विविध कारणे देत दोन वेळा मुदतवाढ घेण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. केवळ ६० दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित असलेले हे काम वारंवार मुदतवाढ मिळूनही अद्याप प्रत्यक्षात पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. सदर ठेका तात्काळ रद्द करून नवीन निविदा काढण्याची मागणी केली.

या तिन्ही निवेदनांवर चर्चा करताना मुख्याधिकारी संजय जाधव यांनी संबंधितांना नोटिसा बजावणे, आवश्यक तेथे ठेके रद्द करणे आणि कामे तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळाने शहरातील इतरही प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले. मुरादपूर येथील गणपती मंदिर ते अमेय पार्क रस्त्याची दुरवस्था, ग्रॅव्हिटी पाईपलाईन योजनेतील संथ गती, पंचायत समिती कार्यालयासमोरील महामार्गालगत बुद्धवाडी ते दीपक हॉटेल दरम्यानच्या सर्विस रोडच्या समस्या यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव उर्फ बाळा कदम, राजू देवळेकर, संजय रेडीज, बापू चिपळूणकर, गणेश फके, सचिन चोरगे यांनी सहभाग घेतला. यावेळी उपशहर प्रमुख राजू विखारे, राजन खेडेकर, मनोज पांचाळ, युवा सेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, संतोष मिरगल, विनोद कानेकर, मनोज शिंदे, महेंद्र काणेकर, राजू अदावडे, पंकज कदम, राहुल गुरव आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments