चिपळुणात संविधान भवन उभारू या
हत्ती माळाचे ऐतिहासिक महत्व जपण्यासाठी एकत्र येण्याचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचे आवाहन
चिपळूण: खेर्डी औद्योगिक वसाहतीतील हत्ती माळाला मोठे ऐतिहासिक महत्व आहे. त्यामुळे येथे संविधान भवन उभारुया असे प्रतिपादन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले. यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची साद घालतानाच या भवनात स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम, वाचनालय आदी सुविधा उपलब्ध करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
चिपळूण बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेच्यावतीने रविवारी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्वसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, १९३५ साली बाबासाहेबांनी हत्ती माळ येथे खोती परिषद घेतली होती. त्यामुळे या जागेला ऐतिहासिक महत्व आहे. यामुळे तेथे संविधान भवन उभारण्याबाबत एक संघटना प्रयत्न करीत आहे. ही बाब चांगली आहे. मात्र हे भवन उभारताना सर्वांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी यासाठी आपल्याला मदत करण्यास तयार आहेत. या भवनात स्पर्धा परिक्षांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा, भव्य वाचनालय व अन्य बाबी उपलब्ध करण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जयंती महोत्सवानिमित्त अनेकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे सदस्य सुभाष जाधव, नगरपरिषद बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के,
नगरसेविका नसरीन खडस, निलम जाधव, पल्लवी महाडीक, प्रा. डॉ. जी. बी. राजे, बौद्धजन पंचायत समितीचे जिल्हाध्यक्ष उत्तम जाधव, तालुकाध्यक्ष शांताराम जाधव, उपाध्यक्ष संतोष कदम, सहचिटणीस जीवन पवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेश मोहिते, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मिलिंद पवार, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी माधुरी सावंत, सेवानिवृत्त वायुदल अधिकारी सतीश पवार, समता सैनिक दलाचे प्रमुख प्रशिक्षक, मार्शल संतोष मोहिते, प्रथमेश तांबे, सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा जा प्रेरणा जाधव, अपर्णा जाधव, प्रदिप मोहिते, किशोर मोहिते उपस्थित होते.
चौकट
पंचायत समितीचे कायम सहकार्य राहील - खेतले
यावेळी बोलताना पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले म्हणाले की पंचायत समिती परिसरात असलेल्या जागेत संविधान भवन उभारण्याचा ठराव आम्ही सर्वांनी केला आहे त्यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र जर हत्ती माळ येथे ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी भवन तेथे होणार असेल तर पंचायत समितीसह आमदार शेखर निकम यांचे कायम सहकारी राहील असे आश्वासन त्यांनी दिले.

Comments
Post a Comment