शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या; २४ तासात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला पुन्हा आवाहन


नवीदिल्ली : पश्चिम आशियातील सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांनी 24 तासात दुसऱ्यांदा आवाहन केले आहे. देशातील वाढत्या इंधन वापराला लगाम घालण्यासाठी आणि जागतिक तेल संकट पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे.

पश्चिम आशियात  सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या आधीही पंतप्रधान मोदींनी देशावासियांना काही आवाहनं केली होती. त्यामध्ये पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करा, वर्षभर सोन्याची खरेदी करू नका, तसेच शक्य तिथे सार्वजनिक वाहनांचा वापर करा असं मोदी म्हणाले होते. आज सलग दुसऱ्या दिवशीही पंतप्रधानांनी तेच आवाहन पुन्हा एकदा केल्याचं दिसून आलं. देशातील 140 कोटी लोकांनी फक्त एक पाऊल पुढे टाकलं तर 140 कोटी पावलं आपण पुढे जाऊ. त्यामुळे कोणतंही संकट आपल्या विकासाला अडचण ठरू शकणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

वडोदरा येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत लोकांनी लहान पण महत्त्वपूर्ण पावले उचलावीत, तसेच पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे. कारपूलिंगचा अवलंब करणे तसेच घरून काम (वर्क फ्रॉम होम) आणि व्हर्च्युअल मीटिंगला प्रोत्साहन द्यावे. सरकारी आणि खासगी ऑफिसमध्ये वर्क फ्रॉम होमसाठी भर द्यावा असं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन केलं. शाळा आणि क्लासचे ऑनलाईन वर्ग भरवावे त्याचसोबत त्यांनी सुट्टी आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशात जाण्याऐवजी भारतातच पर्यटन स्थळांचा पर्याय निवडावा असं आवाहन केलं.

Comments