वाशिष्ठी नदीत मेलेल्या माशांचा खच
खेर्डी एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण
चिपळूण : खेर्डी एमआयडीसी लगतच्या परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून वाशिष्ठी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीच्या पाण्यावर शेकडो मासे तरंगताना दिसून आल्याने पर्यावरणीय व आरोग्य संकटाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही तासांत नदीच्या विशिष्ट पट्ट्यात मृत माशांचा खच साचलेला दिसून आला. या प्रकारामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून “या प्रकारामुळे कोणती रोगराई पसरणार नाही ना?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार, खेर्डी एमआयडीसी परिसरातून नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संबंधित यंत्रणांकडून पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेतले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “जर औद्योगिक सांडपाण्यामुळेच मासे मृत्यूमुखी पडले असतील, तर जबाबदारांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.या घटनेची प्रशासनाकडून सखोल चौकशी होऊन नेमकी कारणे समोर येणार का, तसेच प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्यांवर कोणती कारवाई होणार, याकडे संपूर्ण खेर्डी परिसराचे लक्ष लागले आहे.
चिपळूण प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाब विचारावा लागेल.अतिशय बेजवाबदारपणे चिपळूण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी वागत आहेत याची प्रचिती मी स्वतः घेतली आहे. वाशिष्टी नदी प्रदूषण फोफावत आहे. आवर घालण्याचे धाडस प्रदूषण मंडळाने दाखवावे
ReplyDelete