बामणोली डिंगणकरवाडी येथे  शाहू महाराज पुण्यतिथी साजरी

सरपंच सुदेश गमरे यांनी केले मार्गदर्शन



चिपळूण : तालुक्यातील नवतरुण मित्र मंडळ बामणोली डिंगणकरवाडी यांच्या वतीने बुधवार ६ मे रोजी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गावचे सरपंच सुदेश गमरे यांनी मार्गदर्शन केले.

सकाळी ११ वाजता डिंगणकरवाडी सभागृहामध्ये शाहू महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करताना प्रथम दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सरपंच सुदेश गमरे यांनी  शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सरपंच श्री. गमरे यांनी सांगितले की, कोल्हापूर संस्थानाचे  थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते. त्यांची  पुण्यतिथी ६ मे रोजी नवतरुण मित्र मंडळ डिंगणकरवाडी साजरी करत आहे हेच मोठे कार्य मंडळ करीत आहे.  शाहू महाराज यांचे ६ मे १९२२ रोजी  निधन झाले. समतावादी विचार, आरक्षणाचे जनक आणि लोककल्याणकारी राजे म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी कोल्हापूर संस्थानात सामाजिक समता, अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षण आणि शिक्षणाचा प्रसार यांसाठी मोलाचे कार्य केले. त्यांनी १९०२ मध्ये मागासवर्गीयांना ५० टक्के आरक्षण देऊन समतेचा पाया रचला.  त्यांची  'लोकराजा' अशी ही ओळख आहे.  सरपंच यांनी बोलताना संविधान जागृतीवर प्रकाश टाकला. यावेळी वाडीचे युवा कार्यकर्ते संदेश कुळे, विश्वजित तांबिटकर यांनीही मनोगत व्यक्त केले.शेवटी मंडळाचे अध्यक्ष राजाराम घाणेकर यांनी शाहू महाराज यांना बद्दल विचार व्यक्त केले. 

या कार्यक्रमाला स्थानिक मंडळाचे अध्यक्ष राजाराम घाणेकर, सचिव बाबुराव  डिंगणकर, उपाध्यक्ष नामदेव घाणेकर,  खजिनदार तुकाराम डिंगणकर , कृष्णा कुळे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष रोशन डिंगणकर,  सचिव रोहित पावसकर,  स्थानिक मंडळ उपसचिव संतोष कुळे, यशवंत डिंगणकर, गणपत बोबले, मुंबई मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड संतोष कुळे यांनी केले.

Comments