चिपळूणमध्ये पक्ष बांधणी करून सामान्य कार्यकर्त्यालाच आमदार बनवू या – विजय देसाई
शरद पवार यांना सोडून जाणारे संधी साधू ; कार्यकर्त्यांनी लोकांच्या समस्यांकडे लक्ष द्या
चिपळूण : देशाच्या राजकारणात शरद पवार यांच्या सारखा महारथी आणि अभ्यासू नेता नाही. त्यांनी अनेक व्यक्तिमत्व घडविली आहेत. कित्येकांना राजकीय क्षेत्रात संधी देऊन त्यांचे राजकारणातील व्यक्तिमत्व यशाच्या उंचीवर नेले आहेत. मात्र, ज्या शरद पवारांनी ज्यांना नगराध्यक्ष, आमदार अशी मोठी पदे दिली, मान-सन्मान दिला, पक्षात स्थान दिले, त्याच शरद पवारांना काही जण सत्तेच्या हव्यासापोटी सोडून गेले. यापेक्षा आणखी काय दुर्दैव असणार? असा झणझणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य निरीक्षक विजय देसाई यांनी नाव न घेता लगावला. मात्र उपस्थितीत असणाऱ्या हा टोला कुणासाठी आहे हे लगेच समजले.
चिपळूण शहरातील शिक्षक पतपेढी हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट पक्षाच्या चिपळूण कार्यकर्ता बैठक मेळावा आणि पदोन्नती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी गटावर तसेच काही माजी पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका केली. देसाई म्हणाले, शरद पवारांनी अनेकांना मोठे केले, पदे दिली, प्रसिद्धी दिली. मात्र केवळ शरद पवारांनी फोन केला नाही, एवढ्या कारणावरून पक्ष सोडून जाणे योग्य नाही. शरद पवारांनी तुम्हाला एवढा सन्मान दिल्यानंतर आणखी काय द्यायला हवे होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, शरद पवारांनी मोठे केलेल्या लोकांनी आज त्यांच्या घराकडे पाठ फिरवली असून पालकमंत्र्यांच्या घराबाहेर फिरत आहेत. यासारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी नाही. यावेळी त्यांनी जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने यांना सूचना देताना, पुढील तीन वर्षांत चिपळूणमध्ये पक्षाची योग्य ती बांधणी करून सामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्याची तयारी करा, असे स्पष्ट निर्देश दिले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावरही त्यांनी जोरदार टीका केली. कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाचे काम १७ वर्षांपासून पूर्ण झालेले नाही. तरीही सरकार टोल वसुली करायला लागत आहे. आधी काम पूर्ण करा आणि मग टोल घ्या. या रखडलेल्या कामामुळे जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा सरकारचा नाकर्तेपणा आहे, जनतेने देखील पुढील 17 वर्षे सरकारला टोल देऊ नका असे बोलताना सांगितले.
तसेच, जनतेनेही पुढील काळात असा निष्क्रिय कारभार सहन करू नये, जेथे गरज आहे तेथे लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलने करा. आवाज उठवा. पण शांत बसून निष्क्रिय बनू नका असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.यावेळी प्रदेश निरीक्षक महेश चव्हाण यांनीही पक्ष बांधणी संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते काही पद नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये चिपळूण तालुकाध्यक्षपदी अविनाश केळसकर, चिपळूण तालुका महिला अध्यक्षपदी अरुता आडवीलकर, चिपळूण ओबीसी तालुका अध्यक्ष वासुदेव आप्पा मेस्त्री, चिपळूण शहर उपाध्यक्ष महिला पदी दीपा कोतवडेकर, चिपळूण शहर अध्यक्ष पदी समीर देसाई आणि चिपळूण राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षपदी मुन्ना जसनाईक यांची आज नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रदेश निरीक्षक महेश चव्हाण, विजय देसाई, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, अक्षय कोदारी, सुजाता तांबे, महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर, शिरीष काटकर, सतीश खेडेकर, प्रकाश साळवी, महेंद्र कदम, यासीन खान असे अनेक पदाधिकारी आणि महिला वर्ग उपस्थित होता.

Comments
Post a Comment