डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे क्रांतीचा धगधगता विचार - आ शेखर निकम 

खेर्डी येथील खोती विरोधी परिषद कार्यक्रमात केले प्रतिपादन

हत्तीचा माळ येथे संविधान भवन आणि क्रांतीस्तंभ होणार

कार्यक्रमाला भीमसैनिकांची अलोट गर्दी 





चिपळूण  : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाला लाभलेले एक महान नेतृत्व आणि व्यक्तिमत्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक क्रांती, धम्माचा जाणता उपासक, विद्वत्तेचा महामेरू आणि शिक्षण क्षेत्रातील एक महान सम्राट होय. साऱ्या विश्वात आपल्या  कर्तृत्वाचा ठसा उमटणारे डॉ. आंबेडकर म्हणजे भारतीय समाज जीवनाचे अविभाज्य अंग आहे.  त्यांनी  खोती विरुद्ध परिषद घेऊन समाजातील शेतकरी वर्ग आणि इतर नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे मोठे कार्य केले आहे. म्हणून आज हा कार्यक्रम होतं आहे. त्यामुळे बाबासाहेब म्हणजे एक क्रांतीचा धगधगता विचार असल्याचे मत चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आ. शेखर निकम यांनी व्यक्त केले.


चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती चिपळूण मुंबई या संस्थेचा 85 वा वर्धापन दिन व खोती विरोधी परिषदेचा 88 वा वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन खेर्डी येथे हत्तीचा माळ या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 

या कार्यक्रमाच्या वेळी आ. शेखर निकम, आ. भास्कर जाधव,  चिपळूण पंचायत समिती सभापती सूर्यकांत खेतले, नगरसेविका नीलम जाधव,  राणीम महाडिक, ज्येष्ठ साहित्यिक ज. वी. पवार, पत्रकार, युवराज मोहिते, पंचायत समिती सुभाष जाधव, प्रा विजय मोहिते,  ॲड संतोष कुळे, मारुतीकाका जोशी, जिल्हा परिषद सदस्या  सौ रावी मोरे, आर पी आय मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, अध्यक्ष विठोबा पवार, चंद्रकांत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना आ. निकम म्हणाले की,  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःचे आयुष्य वेचले आहे. त्यांनी संविधानाच्या मार्फत भारतातील प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिले आहेत. ही अनमोल देणगी आहे.  खोती विरुद्ध परिषद ही  आताची खेर्डी ( हत्तीचा माळ) येथे १६ मे १९३८ मध्ये बाबासाहेब यांनी घेतली. या खोती परिषदेला बहुजन समाजातील अनेक शेतकरी वर्ग उपस्थित होता.  खोती पद्धत शेतकऱ्यांना त्रासदायक होती. त्यांचे शोषण केले जात होते. यासाठीच बाबासाहेब यांनी खोती विरुद्ध परिषद घेत कसेल त्याची जमीन असा ठराव केला. मात्र, यासाठी त्यांना कडवा संघर्ष करावा लागला. विशेषता चिपळूणमधील  बाबासाहेब यांचं सहकारी ॲड सीताराम बेंडके,  रत्नाबाई भडवलकर,  भास्कर कोवळे या अनेक जातींचे  लोक बाबासाहेबांच्या सोबत खोती परिषदेमध्ये होते.  ही सुद्धा ऐतिहासिक घटना आहे आणि म्हणूनच हत्तीचा माळ येथे संविधान भवन आणि क्रांती स्तंभ होण्याची मागणी संस्थेची रास्त असून लवकरच ही मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्न करू असे सुद्धा आमदारांनी बोलताना सांगितले. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एका विशिष्ट जातीचे नसून हे सर्वांचे आहेत.   त्यांच्यामुळेच देशाला सर्वोत्तम राज्यघटना मिळाली आहे.

 शिक्षणावर त्यांनी भर दिला. सर्वांनी शिकले पाहिजे तरच आपला उद्धार होईल असे सांगितले.  बाबासाहेब हे फक्त माणूस नसून तो एक क्रांतीचा विचार आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले.  बाबासाहेब आंबेडकर चे स्वतःसाठी जगले असते तर ते जगाची सर्वात श्रीमंत माणूस म्हणून जगले असते . त्यांच्याकडे अनेक पदव्या होत्या.  ते बॅरिस्टर होते तेअर्थतज्ञ होते आणि  कायदेतज्ञ ही होते.  डॉ बाबासाहेब हे वैचारिक दृष्ट्या समृद्ध असलेले जगातील एक नंबरचे विद्वान होते. परंतु बाबासाहेबांनी  स्वतःच्या कुटुंबाचा आयुष्याचा त्याग करत समाजासाठी संपूर्ण आयुष्य वेचले ही क्रांती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे महान व्यक्ती करू शकते. हत्तीच्या माळावरती संविधान भवन होणे  हीच खरी नव्या पिढीला एक प्रेरणादायी घटना  असेल असे त्यांनी शेवटी नमूद केले.

 यावेळी आ. भास्कर जाधव यांनी  सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोती  परिषद घेत महत्त्वपूर्ण ठराव करून कसेल त्याची  जमीन असा कायदा करण्यात आला. खऱ्या अर्थाने असे विचारमंथन  होणे गरजेचे आहे.  गेल्या ८८ वर्षानंतर  संस्था एकत्र संविधान भवनाची मागणी करत आहेत त्यासाठी निश्चितच प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.  मानवी हक्काचे कैवारी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते असे त्यांनी नमूद केले. 


चौकट

चिपळूण हत्तीचा माळ येथे  बाबासाहेबांनी 16 मे 1938 साली खोती विरुद्ध परिषद घेतली. त्यावेळी बाबासाहेबांसोबत असणारे विविध जातीतील त्यांचे सहकारी  भास्कर कोवळे,  रत्‍नाबाई भडवळकर, सिताराम बेंडके,  बर्वे या बाबासाहेबांच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या वारसदारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या विचार मंचकालाच सिताराम बेंडके विचार मंच असे नाव देण्यात आले होते तर रत्‍नाबाई भडवलकर हे नाव सभागृहाला देण्यात आले होते. प्रवेशद्वाराला भास्कर कोवळे यांचे नाव देण्यात आले होते . या  कार्यक्रमात या सर्वांची जाणीव संस्थेने ठेवली होती हेच मोठे काम आहे . यावेळी  कोवळे यांच्या घराण्यातील आताचे वारस प्रफुल कुमार कोवळे यांचा सन्मान करण्यात आला. तर बेंडके परिवारातून सुधाकर बेंडके आणि रत्‍नाबाई भडवळकर यांचे वारसदार गणपत  भडवळकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. सिताराम बेंडके यांच्या घरामध्ये बाबासाहेब स्वतः राहिले होते. आले होते.  त्यामुळे चिपळूणभूमी पवित्र भूमी आहे.  आणि ही भूमी खऱ्या अर्थाने पावन झाली असे म्हणता येईल.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती चिपळूण मुंबई यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष विठोबा पवार यांनी केले तर चंद्रकांत सावंत यांनी ही कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. कार्यक्रमाला संदेश पवार, राजू जाधव, नितीन ठसाले, विकास गमरे, श्री. खताते, समता दल कार्यकर्ते, आणि विभागवार पदाधिकारी उपस्थित होते. तर सूत्रसंचालन कविता बोरवणकर हिने केले.

Comments