भरधाव डंपरची रिक्षाला धडक; एक ठार, रिक्षाचालक गंभीर जखमी
खेड : तालुक्यात आज एक भीषण अपघात घडला आहे. भरणे-खेड मार्गावरील आठवडा बाजार परिसरात भरधाव डंपरने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिलारेआळी येथील संतोष भिलारे हे आपल्या रिक्षातून भरणेहून खेडच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात संतोष भिलारे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. संबंधित व्यक्ती रिक्षामध्ये प्रवास करत होती की रिक्षात बसण्यासाठी हात दाखवत असताना अपघाताची शिकार झाली, याचा तपास खेड पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, 108 रुग्णवाहिका सेवा आणि खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. या अपघाताचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

Comments
Post a Comment