बुध्दांनी जगाला समतेचा आणि शांतीचा संदेश दिला - अशोक धनावडे 

निर्व्हाळ येथे बुद्ध विहार लोकार्पण व बुद्ध मूर्ती स्थापना सोहळा 

 


चिपळूण  : भगवान गौतम बुद्धांच्या शांतता, समता आणि बंधुत्वाचा संदेश देत जगाला युद्धाचे नाही तर बुद्धाची गरज आहे. असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक अशोक धनावडे यांनी  निर्व्हाळ येथे केले. रविवार दिनांक 17 मे रोजी बुद्ध विहाराचे व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रमात ते बोलत होते.

 यावेळी गुहागरचे आमदार भास्कर जाधव, आदर्श बौद्धाचार्य शशिकांत जाधव, ठाणे शहर काँग्रेस सरचिटणीस अनंत सावंत, माजी नगरसेवक, मुंबई महानगरपालिका दयानंद मोहिते, चेअरमन  AMS इंटरप्राईजेस संतोष कांबळे, संपादक नवशक्ती वृत्तपत्र प्रकाश सावंत, पंचायत समिती सदस्य गौरव पाटेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद निवळकर, माजी सरपंच रामदास पवार, ग्रामस्थ शैलेश मोहिते, रूपाली मोहिते, कल्पना पवार, रिया पवार, सुनील सकपाळ, सुदेश सकपाळ, राजेंद्र कांबळे, पोर्णिमा कांबळे, संतोष गमरे,संदेश मोहिते, दीपक मोहिते, सचिन मोहिते, प्रवीण मोहिते, मोहन सावंत  आदि उपस्थित होते. 

पुढे बोलताना श्री.धनावडे म्हणाले की, प्रत्येक मानवाला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आवश्यक आहेत. त्याचबरोबर चांगले विचार देखील आजच्या काळात महत्त्वाचे आहेत. तथागत गौतम बुद्धाने चार हजार वर्षापूर्वी मानवी जीवनासाठी आपले विचार मांडले आहेत. ते आजच्या परिस्थितीत आपण सर्वांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले.

 यानंतर गुहागर खेडचे आमदार भास्कर जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध हे आपल्या भारत भूमीमध्ये जन्माला आले आहेत, हे आपले भाग्यच आहे. या नूतन कुशिनारा विहारातून प्रचार व प्रसार करून प्रबोधन करावे, असे आ जाधव यांनी सांगितले. या विहारात विविध प्रकारचे मार्गदर्शन केले जाणार आहेत. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, संगणक प्रशिक्षण केंद्र, शिवणकला प्रशिक्षण केंद्र, महिला बचत गट प्रशिक्षण व स्वयंरोजगार मार्गदर्शन या विहारातून होईल.   या विहाराला लागणारी मदत करू अशी हमी त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत सावंत सावंत यांनी केले तर उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल  बौद्ध विकास मंडळ निर्व्हाळ स्थानिक/ मुंबई,आम्रपाली महिला मंडळ, निर्वाहळ सिद्धार्थ गायन पार्टी यांचे आभार  मानले.

Comments