मोफत कृत्रिम अवयव मोजमाप शिबिरात १७५ दिव्यांगांचा सहभाग

स्कॉन प्रो फाउंडेशनचा उपक्रम 



रत्नागिरी : भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र (पुणे), स्कॉन प्रो फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत कृत्रिम पाय-हात मोजमाप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साळवी स्टॉप येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात झालेल्या या शिबिरात रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच नजीकच्या जिल्ह्यांतील १७५ हून अधिक दिव्यांगांनी सहभाग नोंदवला.

शिबिरात दिव्यांगांच्या हात व पायांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने मोजमाप घेऊन मोल्ड तयार करण्यात आले. पुढील महिन्यात आधुनिक ‘मॉड्यूलर’ कृत्रिम पाय व हात लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. वजनाने हलके आणि ऑटोफोल्ड सुविधायुक्त हे कृत्रिम अवयव बसवल्यानंतर लाभार्थी चालणे, धावणे, पोहणे, वाहन चालवणे तसेच शेतीची कामेही सहज करू शकणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

उद्घाटन कार्यक्रमाला स्कॉनचे ज्येष्ठ संचालक सतीश चव्हाण, संचालक महेश मायदेव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक अप्पासाहेब पराडकर, भारत विकास परिषद दिव्यांग केंद्राचे विश्वस्त विनय खटावकर, राजशेखर अभ्यंकर, बांधकाम व्यावसायिक अनिल चन्ने, रोटरी क्लब स्कॉनच्या सचिव अपूर्वा ब्राह्मणे, जनसंपर्क अधिकारी राहुल पुरकर आदी उपस्थित होते. शिबिराचे समन्वयक ॲड. दीपक पटवर्धन यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना विनय खटावकर म्हणाले, “दिव्यांग म्हणजे परमेश्वर असून त्यांच्या सेवेतून नारायण सेवा घडते. दिव्यांगांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पुढील महिन्यात कृत्रिम अवयवांचे वितरण केले जाईल. स्कॉन प्रो फाउंडेशनने सीएसआर निधी उपलब्ध करून दिल्यामुळे हे कार्य शक्य झाले आहे.”

महेश मायदेव यांनी “कोकण दिव्यांगमुक्त व्हावे, ही स्कॉन प्रोजेक्टचे संस्थापक नीलेश चव्हाण यांची इच्छा असून, त्याच उद्देशाने सलग चौथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे,” असे सांगितले.

शिबिरस्थळी दिव्यांग व त्यांच्या सोबत आलेल्या व्यक्तींसाठी चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच स्वयंसेवकांनी दिवसभर नियोजनबद्ध पद्धतीने सेवा देत दिव्यांगांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली.

Comments