वीरेश्वर तलावाला झाडाझुडपांचा वेढा;  पाण्यामध्ये कचरा, प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच


चिपळूण : शहरातील एसटी स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या ऐतिहासिक वीरेश्वर तलावाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून तलाव परिसरात अस्वच्छतेचे चित्र पाहायला मिळत आहे. तलावाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा, कुरकुरे व इतर खाद्यपदार्थांची पाकिटे तरंगताना दिसत असून तलावाच्या कडेला झाडाझुडपांचे साम्राज्य वाढल्याने संपूर्ण परिसर विद्रूप झाला आहे. 

नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा ऐतिहासिक तलाव सुशोभीकरणापासून वंचित राहिल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पालिकेकडून तलावाच्या बाहेरील परिसरात काही प्रमाणात स्वच्छता केली जात असली तरी तलावाच्या आतील भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तलाव परिसरात फिरण्यासाठी येणारे विद्यार्थी, नागरिक आणि पर्यटकांकडून निष्काळजीपणे प्लास्टिकच्या बाटल्या व कचरा फेकला जात असल्याने पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. यामुळे तलावातील जलचरांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, वीरेश्वर तलावाच्या शेजारी असलेल्या नारायण तलावाकडे नगरपालिकेने विशेष लक्ष देत त्या परिसरात सीसीटीव्ही व्यवस्था, स्वच्छता आणि सुशोभीकरणाची कामे केली आहेत. मात्र, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वीरेश्वर तलावाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वर्षांपूर्वी या तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने तलावाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे नारायण तलावाप्रमाणेच वीरेश्वर तलावाचेही सुशोभीकरण करण्यात यावे, तलावातील प्लास्टिक कचरा हटवून पाण्याची स्वच्छता करावी तसेच परिसरातील वाढलेली झाडाझुडपे तातडीने साफ करावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी नगर परिषद आरोग्य विभागावर टीका करत, ‌‘वीरेश्वर तलाव परिसरातील साफसफाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून नागरिकांनी वारंवार आवाज उठवल्यानंतरच साफसफाई केली जाते. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,‌’ अशी आग्रही मागणी केली आहे. ,


Comments