‘पिफास’ प्रकरणी लवकरच मंत्रालयात बैठक

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे आंदोलकांना आश्वासन


खेड : लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये पिफास उत्पादन बंद करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२९ दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला अखेर शासन स्तरावरून दखल मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शुक्रवारी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची आंदोलकांनी भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. लवकरच आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची मंत्रालयात बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये पिफास (PFAS) रसायनाचे उत्पादन सुरू असल्याचा आरोप करत कंपनी बंद करण्याच्या मागणीसाठी कोकण नागरी संघर्ष समिती आणि स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या १२९ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. मात्र, इतका दीर्घ कालावधी उलटूनही प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

दरम्यान, शुक्रवारी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या खाजगी दौऱ्यानिमित्त लोटे एमआयडीसी परिसरात आल्या असता आंदोलकांनी त्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पिफास उत्पादनामुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांविषयी चिंता व्यक्त करत कंपनीविरोधातील आपली भूमिका मंत्र्यांसमोर मांडली.

आंदोलकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी तत्काळ रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आणि आक्षेप गांभीर्याने ऐकून घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.

याचबरोबर, आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची बैठक लवकरच मंत्रालयात आयोजित करण्यात येईल, असे आश्वासनही मंत्री महोदयांनी दिल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. त्यामुळे गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या आंदोलनाला प्रथमच शासन स्तरावरून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतील पिफास उत्पादन तात्काळ बंद करण्यात यावे, पर्यावरणीय परिणामांचा स्वतंत्र अभ्यास करण्यात यावा आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्य व पर्यावरण सुरक्षेची हमी द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असल्याचे कोकण नागरी संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे.

या प्रसंगी आंदोलनकर्ते अशोक जाधव, उदय घाग, रवींद्र गोवळकर, कांचन चव्हाण, मंगेश चव्हाण, बशीर मुजावर, अनिल सदरे, जुवळे, जाधव आदी उपस्थित होते.दरम्यान, पर्यावरण मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून शासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण खेड तालुक्यासह लोटे एमआयडीसी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comments