कवी भूषण यांच्या काव्य छंदातून मांडलेली कलाकृती म्हणजेच शिवराज भूषण महानाट्य

रंगमंचावर  शिवरायांच्या जाज्वल्य पराक्रमाची यशोगाथा पाहताना रसिक भारावले 


संतोष कुळे

चिपळूण  : छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य पराक्रमी इतिहास आजही प्रेरणादायी आहे. जगभर त्यांची किर्ती पसरली आहे. मात्र  ज्या कवीने हा इतिहास  काव्यातून शब्दबद्ध केला असे शिवकालीन कवी भूषण यांच्या काव्य छंदातून नटलेले नाटक शिवराज भूषण महानाट्य होय.  या नाटकाच्या सादरीकरणाला आणि प्रत्यक्ष शिवकल्याण विचार ऐकताना शिवप्रेमी रसिकांनी उदंड प्रतिसाद देत सादरीकरणाचे कौतुक केले.

चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये श्री शिवराज मंच यांच्या वतीने शिवराज भूषण महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकात एकूण 80 कलाकार होते.  तर प्रत्यक्ष घोड्यावरून शिवाजी महाराजांचे आगमन दाखवण्यात आले होते. महानाट्याच्या  प्रारंभीच निवेदकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीची परिस्थिती होती. त्या परिस्थितीवर अतिशय खुबीने भाष्य केले. महंमद गझनीचा काळ आणि तेव्हाची स्थिती याचे वर्णन  सुंदर पद्धतीने केले होते.  

 त्यानंतर शिवनेरी किल्ल्यावर एक सोनेरी पहाट उगवते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतो.  त्यानंतरचा जो काळ आहे त्या काळाचे निवेदकांनी  अगदी लयबद्ध आणि समर्पक असे निवेदन केले.  रंगमंचावर   छत्रपतींच्या पराक्रमाची गाथा यावेळी दाखवण्यात आली.  या शिवराज भूषण  नाटकातून छत्रपती महाराजांनी शत्रूला कसे नामशेष करत स्वराज्याचा पताका फडकवला  यावर काव्य छंदातून  उत्तम सादरीकरण करण्यात आले. इतिहासातील अफजल खानाचा वध त्यानंतर बाजीप्रभूंनी  पावनखिंडीत केलेला  पराक्रम,  शाहिस्तेखानाची लालमहालमध्ये छाटलेली बोटे  हे पराक्रमाचे क्षण महानाट्यातून दाखवण्याचा प्रयत्न निर्माता भूषण साटम  यांनी केला आहे.  

प्रत्यक्ष या नाटकात खास आकर्षण होते ते कवी भूषण यांची भूमिका  करणारे भूषण साटम यांची अदाकारी.   जेव्हा कवी भूषण  कानपूर जवळील एका लहानशा या गावातून रायगडावरती येतो.  शिवरायांची भेट  होताच  महाराज त्याची ओळख विचारतात. त्यानंतर   जगदीश्वराच्या मंदिरामध्ये भेटीच्या दरम्यान काही काव्य पंक्ती भूषण महाराजांना ऐकवतो. यावेळी महाराज त्याच्यावर आणि त्याच्या प्रतिभावंत सादरीकरणावर खुश होतात. यावेळी कवी भूषण यांचा सन्मान ही केला जातो.

त्यानंतर  महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे आणि प्रत्येक गोष्टीचे यथार्थ काव्यातून वर्णन कवी भूषण रायगडावर असताना करतात.  या नाटकात कवी भूषण ही व्यक्तिरेखा   निर्माता भूषण साटम यांनी अगदी समर्पकपणे साकारली आहे. स्वतः  ब्रीज भाषेतील  काव्यग्रंथांच्या पंक्ती गात अभिनय केला आहे. खरंतर या नाटकातील कलाकारांनी अगदी जीव  ओतून सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.  शिवकालीन अनेक प्रसंग यामध्ये दाखवण्यात आले आहेत.  

राज्यभिषेक सोहळा   अप्रतिम स्वरूपात रंगमंचावर सादरीकारणातून दाखवण्यात आला.   शिवाजी महाराज सिंहासनांवर  विराजमान होताना दाखवले दृश्य पाहून डोळ्यासमोर शिवशाही अवतरली. संपूर्ण  रंगमंच शिवकालीन पात्रांनी भरून गेला होता.  हे दृश्य पाहताना अंगावरती शहारे आले.    

या नाटकातून शिवाजी महाराज यांचा इतिहास पुन्हा जागृत करून जीवनात आलेले नैराश्य कसे शिवविचार आचरणाने दूर केले जातील याचीही माहिती दिली. शिवराज भूषण महानाट्य ही एक नव्या पिढीला  प्रेरणा आहे. नाट्यगृहात रसिकांनी जय भवानी..जय शिवाजी अशा घोषणा देत नाट्यगृह दणाणून सोडले. त्यांच्या मध्येही महानाट्य पाहताना वीररस संचारला होता. या महानाट्याला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लेखक रणजीत हिरर्लेकर यांनी छान लेखन केले आहे. 

शिवराभूषण नाट्य पाहण्यासाठी सागर दैनिकाच्या संपादिका शुभदा जोशी, जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, वन अधिकारी गिरिजा देसाई, मोहन मिरगल, वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस कंपनीच्या सपना यादव, मिनल ओक, मंगेश पेढांबकर आणि अनेक मान्यवर मंडळी हे महानाट्य पाहण्यास उपस्थित होते. निर्माता भूषण साटम यांनी चिपळूणकरांचे शेवटी आभार मानले.

Comments