स्वराज्यरक्षक संभाजी महाराज म्हणजे रणभूमीवरील पराक्रमी धुरंदर - ॲड संतोष भाई  कुळे 

मुंढर खुर्द आडीवाडी येथे संभाजी महाराज जयंती साजरी 


ॲड संतोष कुळे यांचा सन्मान करतानापदाधिकारी

चिपळूण : स्वराज्य रक्षक संभाजी महाराज म्हणजे संस्कृत मधील महान पंडित, एक  महापराक्रमी छत्रपती आणि स्वराज्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत औरंगजेब सारख्या शत्रूला सळो की पळो करून सोडले एवढे धाडस संभाजी महाराजांमध्ये होते.  त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये एकही लढाई हरली नाही. यावरून संभाजी महाराज म्हणजेच राजकारण आणि साहित्यिक क्षेत्रातील एक यशस्वी धुरंदर होते, असे मत कुणबी  समाजोन्नतीन्संघ मुंबई शाखा ग्रामीण चिपळूणचे अध्यक्ष ॲड संतोष भाई कुळे यांनी व्यक्त केले. 

गुहागर तालुक्यातील श्री साईधाम मित्र मंडळ मुंढर खुर्द आडीवाडी या मंडळाच्य वतीने श्री साई सोहळा आणि छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आयोजित करण्यात आली होती.  त्या कार्यक्रमात ॲड.श्री. कुळे बोलत होते.  
सकाळी प्रथम संभाजी महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करून मंडळाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेश  पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंडळाने १४ मे  रोजी श्री साई भंडारा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, त्याच दिवशी आपल्या महान पराक्रमी  संभाजी राजे यांची जयंती असते. ती साजरी करण्याचे मोठे कार्य मंडळाने केले आहे. यावरून मंडळाचा वैचारिक दृष्टिकोन किती अनमोल आहे हे दिसून येतो.

दुपारच्या सत्रामध्ये संभाजी महाराजांच्या जीवन  कार्यावरती ॲड  संतोष कुळे यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमात पुढे बोलताना ॲड श्री. कुळे म्हणाले की, संभाजी महाराजांना लहानपणापासून अनेक संकटांना सामोरे जावे लागले.  त्यांना बालपण  अनुभवता आले नाही.  दोन वर्षाचे असताना आईचे छत्र हरपले. मात्र मासाहेब जिजाऊने  त्यांना पोटाशी धरून जे संस्कार केले ते संस्कार पुढील काळात  स्वराज्य रक्षक म्हणून संभाजी महाराजांच्या रूपाने स्वराज्यात दिसून आले. एक महान पराक्रमी राजा म्हणून संभाजी महाराज यांच्याकडे पहिले जाते.  त्यांनी  वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर नखशिखांत हा सुद्धा त्यांनी ग्रंथ लिहिला होता. संस्कृत भाषेवरती त्यांचे प्रभुत्व होते.  आपल्या जीवनामध्ये एकही लढाई हरली नाही.  असे अपराजित व्यक्तिमत्व म्हणजे संभाजी राजे होते. अतिशय शिस्तबद्ध आणि राज्यकारभारात पारदर्शकता ठेवणारे राजे होते. मात्र, पुरंदर किल्ल्यावर जन्मलेल्या या धुरंदर राजाचे शेवट मात्र मनाला चटका देऊन गेला असे त्यांनी शेवटी सांगितले. 
यावेळी मराठा सेवा संघ कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश चांदिवडे यांनीही मार्गदर्शन केले.
श्री साईधाम मुंढर खुर्द आडीवाडी मंडळाने दिवसभर अनेक कार्यक्रम राबवले. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा राबविण्यात आले. त्याचे बक्षीस वितरण सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.   स्थानिक व मुंबई मंडळाच्या  सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, महिला मंडळ यांनी परिश्रम घेत हा साई सोहळ्याचा आणि संभाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम यशस्वी केला.

Comments