प्रत्येक जि. प. गटात ५००० रायवळ आंबा लागवड करावी 

जि. प.सदस्य ॲड.  महेंद्र मांडवकर यांची संकल्पना



रत्नागिरी : कोकणातील हापूस आंब्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटात किमान पाच हजार रायवळ आंब्यांची झाडे लावण्याची व्यापक चळवळ उभारावी, अशी मागणी पावस जिल्हा परिषद सदस्य ॲड.महेंद्र मांडवकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.

“एक बाठ (कोय), एक आशा” या मोहिमेअंतर्गत रायवळ आंबा संवर्धनावर भर देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोकणाचा मूळ आंबा हा रायवळ असून हापूस हा त्यावर आधारित विकसित झालेला प्रकार आहे. पूर्वी गावागावांत मोठ्या प्रमाणात रायवळ आंब्याची झाडे होती. मात्र हापूसच्या व्यापारीकरणामुळे रायवळ झाडे कमी होत गेली आणि त्याचा थेट परिणाम हापूस उत्पादनावर होत आहे.

कृषी तज्ज्ञांच्या मते, हापूस आंब्याच्या परागीकरणासाठी रायवळ आंबा अत्यंत महत्त्वाचा आहे. रायवळाच्या फुलांवर येणाऱ्या मधमाशा व इतर कीटकांमुळे हापूसचे परागीकरण प्रभावीपणे होते. रायवळ झाडांची संख्या घटल्याने हापूसला मोहोर कमी येणे, उत्पादन घटणे तसेच बुरशी व किडींचा प्रादुर्भाव वाढणे अशा समस्या निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

रायवळ आंब्याचे झाड ८० ते १०० वर्षे जगते आणि पर्यावरणीय समतोल राखण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे ग्रामपंचायत, शाळा, शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर रायवळ लागवड मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कोकणच्या ओळखीचा हापूस टिकवायचा असेल तर रायवळ आंबा संवर्धन ही काळाची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

जिल्हा परिषदेकडून अपेक्षा

रायवळ बाठ बॅंक सुरू करावी. कृषी विभागाने प्रत्येक पंचायत समितीत रोपवाटिका करावी. स्थायी समितीमध्ये दोन लाख रुपयांचा विशेष ठराव पास करावा. मनरेगा, सामाजिक वनीकरण अंतर्गत हेक्टरी २ लाख १९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध आहे. जिल्हा नियोजन किंवा अन्य सामाजिक वनीकरण आदीच्या माध्यमातून निधी मिळावा. सर्व गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, ग्रामसेवकांना एक घर पाच बाठा मोहीम राबवता येईल, असे मांडवकर यांनी सांगितले.

Comments