राजवाडी ब्राह्मणवाडीच्या गरम पाण्याच्या कुंडाला पर्यटन विकासाची नवी झळाळी
आमदार शेखर निकम यांनी केली विकासकामांची पाहणी…
आरवली : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील राजवाडी ब्राह्मणवाडी येथील प्रसिद्ध गरम पाण्याच्या कुंड परिसराला पर्यटन विकासाच्या माध्यमातून नवी ओळख मिळत असून या ठिकाणी सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी आमदार शेखर निकम यांनी केली.
राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून प्राप्त निधीतून पर्यटकांच्या सोयीसाठी दोन मोठ्या कुंडांची निर्मिती, स्वच्छतागृहे, कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या तसेच इतर मूलभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. या सुविधा पाहून *आमदार निकम* यांनी समाधान व्यक्त करत परिसर अधिक आकर्षक व पर्यटनपूरक करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी त्यांनी बाराव्या शतकातील ऐतिहासिक आणि पुरातन सोमेश्वर मंदिरालाही भेट देऊन मंदिर परिसराच्या जतन व विकासाबाबत चर्चा केली. धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या या स्थळाच्या संवर्धनासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या राजगंगा नदीवरील गाळ उपसा कामाचीही आ.निकम यांनी पाहणी केली. नदी संवर्धनासोबतच परिसराच्या पर्यावरणीय समतोलासाठी हे काम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
पर्यटन विकास, ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि पर्यावरण रक्षण या तिन्ही गोष्टींचा समतोल साधणाऱ्या या उपक्रमामुळे राजवाडी ब्राह्मणवाडी परिसराच्या विकासाला निश्चितच गती मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी सतीश कामत, राजेंद्र सुर्वे, संतोष भडवळकर, प्रभाकर घाणेकर, अमोल लोध, श्रीनिवास पेंडसे, विलास राऊत, खांबे गांवकर, सुहास लिगायत, नंदकुमार कलवारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments
Post a Comment