माणसापेक्षा मुक्या पक्षाची कारागिरी म्हणजे निसर्गातील एक आश्चर्य 

सुगरण पक्ष्याचा खोपा म्हणजे इवल्याशा जीवाची अद्भुत कलाकृती



संतोष कुळे  चिपळूण

निसर्गामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकारचे पक्षी दिसतात. प्रत्येकाचे रंग, रूप आणि त्यांची जोवनशैली सुद्धा निरनिराळी असते. मात्र, या सर्व पक्ष्यांमध्ये सुगरण नावाचा पक्षी अतिशय वेगळा असून त्याची घरटे बनवण्याची जी कलाकृती आहे तीच मानवाला अचंबित करते, आपल्या पिलांसाठी अतिशय परिश्रम घेत सुगरण पक्षीने घरटे बनवते त्याला सुगरणीचा खोपा म्हणतात, इवल्याशा जीवाची कला मानवी कलेपेक्षाही अद‌भुत आहे. माणसापेक्षा मुक्या पक्षाची कारगिरी श्रेष्ठ आहे, असे बोलणे चुकीचे ठरणार नाही.

झाडावर खोपा म्हणजेच सुगरणीचे घरटे दिसले की बहिणाबाई चौधरीच्या पंक्ती आठवल्याशिवाय राहत नाहीत. अरे खोप्यामंदी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला...

आईच्या जीवाची आपल्या लेकरासाठी होणारी घालमेल, माया, ममता, काळजी या पंक्तीतून खूप काही सांगून जाते. ज्या सुगरण पक्षावरून ही कविता बहिणाईंनी रचली आणि सुगरणीचा खोपा साऱ्या जगाला दाखवून दिला. तो खोपा विणण्यासाठी सुगरण पक्षी काम काम करतो हे सुद्धा तेवदेच महत्त्वाचे आहे. त्याची कारागिरी खरंच शिकलेल्या माणसापेक्षा भारी आहे. हा खोपा विणण्यासाठी सुगरण नर पक्षी मेहनत घेत असतो आणि मादी सुगरण आपल्या पिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी   निरीक्षण करत असते. खोप्यामध्ये काही कमी उरली आहे का? हे मादी सुगरण पक्षी पाहते. तिला खोपा योग्य वाटला म्हणजे त्या खोप्यात राहण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र, खोपा बनवण्यासाठी गवताच्या काड्या एकत्र करून आणि आपल्या चोचीच्या सहाय्याने त्याचे विणकाम केले जाते. हे करताना सुगरण पक्षी थकून जातो पण त्याचे काम पूर्ण करतो. यातून मानवाला सुद्धा काही शिकण्यासारखे आहे. हा खोपा इतका कठीण विणला जातो की त्यात त्याची पिल्ले सुरक्षित राहू शकतात. बाहेरून झाडाच्या फांदीला

लटकणारा खोपा पाहून आपल्याला निश्चित आनंद होत असला तरी त्याची आतील ठेवण वेगळी असते. बाहेरून एका बाजूला फुगीर दिसला तरी आतील भागात तो खोलगट असतो. याच खोलगट भागात सुगरण पक्षी पिलासह राहतात. पिल्ले स्वतः उडण्याच्या क्षमतेची झाली की खोप्यातून निघून जातात. हे सुगरण पक्षी घरटी विणतात, त्यावरून एक प्रश्न नेहमीच पडतो, हत्ती, घोडे, बैलांसारखे मोठ्या शरीराच्या प्राण्यांना आपले स्वतःचे घर बनवता येत नाही पण हे चिमुकले पक्षी आपल्या चोचीत गवत पात्या गोळा करुन सुंदर विणीचा खोपा कसा तयार करतात? ही ईश्वराने त्यांना दिलेली एक देणगीच आहे. उंच झाडे बघून सुगरण आपला खोपा झाडाच्या फांदीपासून विणायला सुरुवात करतात. ग्रामीण भागात निंबरा, खैर, ऐन अशा झाडांवर खोपे जास्त दिसतात. सुगरणीचा खोपा म्हणजेच तिच्या पिलांसाठी सुरक्षित मायेचा आसरा असतो. अशा इवल्याशा जीवाने तयार केलेली अद्‌भुत कलाकृती नक्कीच निसर्गाचा एक चमत्कार म्हणावा लागेल.

Comments