गुहागर पाली येथील लोककलावंत संजय पेजले काळाच्या पडद्याआड
एक विनयशील माणूस व कलाकार हरपला
चिपळूण : गुहागर तालुक्यातील पाली गावचे सुपुत्र आणि उत्तम शाहीर कलावंत अशी ओळख असणारे संजय यशवंत पेजले यांचे मुंबई येथे दिनांक २७ रोजी अकस्मात निधन झाले. मृत्यू समयी ते ४६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने पेजले परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संजय पेजले हे उत्कृष्ट वाचक, शाहीर कलावंत आणि शांत संयमी स्वभाव असलेले व्यक्तिमत्व होते. आई जीवदानी फाउंडेशन मुंबई मधून बहुरंगी नमनामध्ये त्यांनी स्वामी समर्थांची भूमिका अतिशय दर्जेदारपणे साकारलेली होती. रसिकांच्या मनात ती भूमिका कायम राहणार आहे. मात्र संजय पेजले यांचे अचानक निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झालेला आहे. ते कुटुंबातील एकमेव कमावणारी व्यक्ती होती. त्यामुळे आता कुटुंब सुद्धा आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. गुहागर तालुक्यातून पालीसारख्या दुर्गम गावातून ते मुंबई शहरांमध्ये नोकरी करता आले. पोटासाठी काम करीत असताना त्यांनी कलेमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला होता. नमन जाखडी कलेत त्यांचं बहुमूल्य असे योगदान होते. असा हा कलावंत २७ मे रोजी काळाच्या पडद्याआड झाला. मात्र त्यांनी केलेली कलाक्षेत्रातील कामगिरी आणि सामाजिक कार्य कायमस्वरूपी लोकांच्या लक्षात राहील. कलेतून ते नेहमी जिवंत राहतील. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
चौकट
एक हरहुन्नरी कलावंत आणि उत्तम माणूस हरपला
लोककलेतून माझ्याशी संजय पेजले हे जोडले गेले. काही दिवसातच आमच्यामध्ये एक वेगळं नातं तयार झाले. हे नातं रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं होते. ही कलावंत म्हणून ते मोठे होतेच, त्याशिवाय एक माणूस म्हणून सुद्धा ती नेहमीच विनयशील होते. त्यांनी आई जीवदानी फाउंडेशन मुंबई या संस्थेमध्ये काम करत नमनातून स्वामी समर्थांची भूमिका इतक्या दर्जेदारपणे साकारले की त्यांची भूमिका पाहताना रसिक स्वतःहून येऊन स्वामींचे दर्शन झालं असे सांगत असत. एवढी भूमिका ते ताकदीने साकारत होते. आज त्यांच्या जाण्याने आमचा कलामंच पोरका झाला आहे . त्यांची उणीव आम्ही कधीच भरून काढू शकत नाही. अशा आम्हाला त्यांचा मोठा आधार होता. आज ते आमच्यात नाहीत ही कल्पनाच मनाला पटत नाही.
भिकाजी भुवड
संस्थापक - आई जीवदानी फाउंडेशन मुंबई


Comments
Post a Comment