स्वच्छ भारत मिशनचे कर्मचारी सहा महिने वेतनाविना
जिल्ह्यात प्रत्येक पंचायत समिती तालुकास्तरावर गट संसाधन केंद्र असून यामध्ये गट समन्वयक व समूह समन्वयक अशी पदे कंत्राटी तत्त्वावर आहेत. डिसेंबर 2025 पासून या कक्षातील कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. परिणामी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. प्रवास खर्च, मुलांचा शैक्षणिक खर्च, तसेच कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवताना ताळमेळ जुळत नाही. सहा महिने वेतन नसल्याने मोठ्या गैरसोयीला त्यांच्या कुटुंबीयांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यामुळेच या कर्मचाऱ्यांनी एक जून पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. स्वच्छ भारत मिशन गट
संसाधन केंद्रातील हे कर्मचारी स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तीक व सार्वजनिक शौचालये मार्गी लागण्यासाठी योगदान देत आहेत. मात्र सहा महिने वेतन नसल्याने त्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेसमोर एक जून ते पाच जून दरम्यान धरणे आंदोलन, आठ जून रोजी राज्यस्तरीय कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव पासून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवास स्थानापर्यंत पायी चालत जाऊन धरणे आंदोलन, नऊ जून पासून मानधन मिळेपर्यंत जिल्हास्तरावर काम बंद आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. चिपळूण येथे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देताना गट संसाधन केंद्रातील सौ. आदिती शिंदे, सौ. ऋूतूजा राजेशिर्के, सौ. विनया लाड उपस्थित होत्या.

Comments
Post a Comment