​फुरसे सापाच्या दंशातून महाडमधील ६ महिन्यांच्या चिमुरड्याचे वाचविले प्राण

डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाची कौतुकास्पद कामगिरी



​चिपळूण : महाड तालुक्यातील गोटे बुद्रुक येथील अवघ्या ६ महिन्यांच्या चिमुरड्याचे सर्पदंशानंतर बी.के.एल. वालावलकर रुग्णालयातील डॉक्टर्स आणि परिचारिका यांच्या तत्पर व कौतुकास्पद उपचारांमुळे प्राण वाचले आहेत. रुग्णालयात मिळालेल्या योग्य उपचारांनंतर बाळाची प्रकृती पूर्णपणे स्थिर झाली असून त्याला सुखरूप घरी सोडण्यात आले आहे. वैद्यकीय पथकाच्या या तत्परतेमुळे एका निष्पाप जीवाचे प्राण वाचल्याने परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, महाड तालुक्यातील गोटे बुद्रुक (जि. रायगड) येथील रहिवासी असलेले सम्रान सागर गोलांबडे (वय ६ महिने) हे बाळ २३ तारखेला पहाटे सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरी झोपलेले होते. अचानक बाळ जोरात रडू लागल्याने त्याचे आई-वडील जागे झाले. त्यांनी प्रसंगावधान राखून आजूबाजूला पाहिले असता, बाळाजवळ 'फुरसे' (Saw-scaled Viper) जातीचा अत्यंत विषारी साप आढळून आला. आई-वडिलांनी तात्काळ बाळाची तपासणी केली असता, त्याच्या डाव्या काखेच्या भागात सापाने दंश केल्याची खूण दिसली, तसेच त्या जागेवरून रक्तस्त्राव व सूज येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

​बाळाची प्रकृती धोक्यात असल्याचे लक्षात येताच पालकांनी त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, महाड येथे दाखल केले. प्राथमिक तपासणीदरम्यान, सापाच्या विषामुळे बाळाच्या शरीरात गंभीर रक्तविषारी (Hemotoxic) परिणाम झाल्याचे डॉक्टरांना आढळून आले. बाळाचे वय अवघे सहा महिने आणि प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने, त्याला पुढील उच्च उपचारांसाठी तातडीने डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला.

​वालावलकर रुग्णालयात आणताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बाळाला तात्काळ बाल अतिदक्षता विभागात (PICU) दाखल करण्यात आले. तेथील तज्ज्ञ डॉक्टरांनी वेळ न घालवता तातडीने सर्पविष प्रतिबंधक उपचार सुरू केले. वेळेवर दिलेल्या प्रतिविष (Anti Snake Venom) उपचारांमुळे बाळाच्या शरीरातील विषाचा प्रभाव हळूहळू नियंत्रणात आला. डॉक्टरांचे कुशल वैद्यकीय उपचार आणि परिचारिकांनी घेतलेली सातत्यपूर्ण काळजी यामुळे बाळाच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली. अखेर बाळ पूर्णपणे धोक्याबाहेर आल्यानंतर त्याला स्थिर अवस्थेत रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

​या अत्यंत संवेदनशील आणि यशस्वी उपचार प्रक्रियेत रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कुर्णे, डॉ. अंकिता सुर्वे, डॉ. मोहित कडू, डॉ. विशाखा संकपाळ, डॉ. पंक्ति मेहता, डॉ. स्वप्नील काळे, डॉ. प्रतीक गोडसे, डॉ. विवेक सूर्यवंशी, डॉ. प्रिया वाघमारे, डॉ. विवेक पवार, डॉ. प्रणय गावंडे आणि डॉ. अजय पाटील यांच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाने विशेष योगदान दिले. त्यांच्या या देवदूतासारख्या कामगिरीमुळे गोलांबडे कुटुंबाने रुग्णालयाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Comments