रात्रभर वीज गायब असल्याने चिपळूण शहरवासीयांच्या नशिबी जागरण
तासनतास वीज खंडित आल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त
संतप्त नागरिकांची महावितरण कार्यालयावर धडक; पोलीस बंदोबस्त तैनात
चिपळूण : प्रचंड उष्म वातावरण असून अशा परिस्थितीत वीज गायब असल्याने चिपळूण शहरवासीयांना रात्र अक्षरक्ष: जागून काढावी लागली. शहरात काल मध्यरात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे गरमीने हाल झाले. सलग अनेक तास वीज नसल्याने शहरातील विविध भागातील नागरिक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात संतप्त नागरिकांनी मध्यरात्रीपासूनच आंदोलनाचा पवित्रा घेत महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली.
वीज गायब असल्यानं मुरादपूर सबस्टेशनसमोर ठिय्या आंदोलन व मध्यरात्रीच कार्यालयावर धडक नागरिकांनी दिली. नगरसेवक साजिद सरगुरोह, मनसेचे चिपळूणकर, राधा लवेकर, असिफ तांबे, लियाकत मेमन आदींसह अनेक नागरिकांनी रात्रभर मुरादपूर स्टेशनसमोर ठिय्या धरत महावितरण प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे माजी नगरसेवक आशीष खातू यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकारी तृप्ती कदम, रोहन मनोरकर, भावेश भाटिया, सुधीर पानकर तसेच अनेक शेकडो खेन्ड, उक्ताड, पेठ माप, गोवळकोट रोड येथील व्यापारी व नागरिकांनी महावितरणच्या पाग कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून थातूरमातूर आणि असमाधानकारक उत्तरे मिळाल्याने वातावरण चांगलेच तापले होते. मध्यरात्रीपासून खंडित झालेला वीजपुरवठा सकाळपर्यंतही सुरू न झाल्याने सकाळी पुन्हा नगरसेवक, उपनगराध्यक्षा, व्यापारी व नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक देत आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना घेराव घातला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, नगरसेवक अंकुश आवळे, शुभम पिसे, कपिल शिर्के, निहार कोवळे, अजय भालेकर, विक्रांत लवेकर, नगरसेविका राणी महाडीक,सफा गोटे तसेच माजी नगरसेवक आशीष खातू, महेंद्र कासेकर, सारिका भावे, राधा लवेकर व उपस्थित नागरिकांनी अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारत त्यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी नगरसेविका हर्षाली पवार, नीलम जाधव, वैशाली निमकर, महंमद फके, प्रणय वाडकर, युवा सेना विनोद शिंदे, जॉन महाडीक, यांच्यासह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.
महावितरणच्या कारभारात सुधारणा कधी होणार?
काही महिन्यांपूर्वी आमदार शेखर निकम यांच्या समवेत महावितरण अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक शहरातील व्यापारी वर्गाने आयोजित केली होती. त्या बैठकीत व्यापारी व नागरिकांनी वीजपुरवठ्याच्या समस्यांचा पाढा वाचल्यानंतर दोन महिन्यांत परिस्थिती सुधारेल, असे आश्वासन महावितरण कडून देण्यात आले होते. मात्र अनेक महिने उलटूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. महावितरण प्रशासनाला नागरिकांच्या तक्रारींबाबत काहीही देणेघेणे नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात आला.
वीज दुरुस्तीची जबाबदारी कराड येथील ठेकेदाराकडे आहे.मात्र महावितरणचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे आणि संतोषकुमार कैरमकोंडा यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला. वीज दुरुस्तीची जबाबदारी कराड येथील एका ठेकेदाराकडे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता, मात्र दुरुस्ती करण्यासाठी संबंधित ठेकेदार सकाळी साडेनऊ वाजता घटनास्थळी पोहोचल्याचे समोर आले. त्यानंतर काही भागांमध्ये वीजपुरवठा सुरू करण्यात आला. दरम्यान, संध्याकाळी चार वाजेपर्यंत पूर्ण वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला. मात्र विजेचा खेळखंडोबा शहरात सूरूच आहे.
मुरादपूर सबस्टेशन कायम तक्रारीचे केंद्र
गेल्या अनेक वर्षांपासून चिपळूण शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असून अर्ध्याहून अधिक शहर तासन्तास अंधारात राहत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. मुरादपूर सबस्टेशन हे कायमच तक्रारींचे केंद्र बनले असून महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप, उक्ताड, खेंड परिसरात मध्यरात्रीपासून वीज गायब असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. खेंड परिसरातील संतप्त नागरिकांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरत तीव्र नाराजी व्यक्त केली.
लोकवर्गणीतून महावितरणला पाच मोबाईल देणार
यावेळी नगरसेवक अंकुश आवळे यांनी महावितरण अधिकाऱ्यांवर गंभीर टीका करत सांगितले की, ‘महावितरणचे अधिकारी नागरीकांच्या जीवाजवळ खेळत आहेत, फोन उचलत नाहीत. फोन सतत ‘बिझी’ लागतो. त्यामुळे नागरिकांना संपर्कच होत नाही. म्हणून शहरातील व्यापारी आणि नागरिकांकडून वर्गणी गोळा करून आम्ही महावितरणला पाच मोबाईल देणार आहोत. निदान नागरिकांनी फोन केल्यावर अधिकारी फोन तरी उचलतील आणि त्यांना योग्य उत्तरे देतील.
महावितरण कर्मचाऱ्यांची दिरंगाई यावरून लक्षात येत आहे. त्यामुळे ऐन मे महिन्याच्या हंगामात वीज गायब असणे हा बेजबाबदाराचा कळस असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Post a Comment