राज्य 'रेल्वे फाटकमुक्ती'मध्ये चिपळूणचं नशीब फाटकं !

कळंबस्ते फाटक मुक्त   २३ वर्षाच्या  मागणी ठरली फोल 

रेल्वे अन्याय निवारण समितीच्या मागणीला शासनाकडून ठेंगा


चिपळूण :  राज्यातील रेल्वे मार्गावर एकही रेल्वे फाटक शिल्लक राहता कामा नये अशा संकल्प सोडलेल्या मुख्यमंत्र्यांनी चिपळूण कळंबस्ते येथील गेली 23 वर्षे मागणी केलेल्या फाटकमुक्तीला मात्र ठेंगा दाखविला आहे. स्थानिक आमदार, खासदार, कोकण रेल्वे प्रशासन यांच्यासह शासनस्तरावर हा प्रस्ताव सातत्याने देऊनसुध्दा या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने कळंबस्ते येथील रेल्वे फाटक मृत्यूचा सापळा ठरला आहे. याविरोधात पंधरागाव परिसरातील गावांनी संताप व्यक्त केला आहे.


महाराष्ट्र राज्याला रेल्वे फाटकांपासून मुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केला आहे.


महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (महारेल) संचालक मंडळाच्या बैठकीत, पहिल्या टप्प्यातील ६५ रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. राज्यातील एकूण १३१ रेल्वे पायाभूत सुविधांच्या कामांपैकी फाटकमुक्त प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले की, राज्यातील रेल्वे मार्गावर एकही रेल्वे फाटक शिल्लक राहता कामा नये. हे प्रकल्प राबवण्यासाठी ज्या मार्गावर रेल्वे आणि वाहनांची वर्दळ जास्त आहे, अशा प्रकल्पांना तातडीने प्राधान्य दिले जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्रासाठी रेल्वे पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात. तसेच महानगरांमध्ये रेल्वे मार्गाच्या आजूबाजूला असलेले वाढते शहरीकरण लक्षात घेता अशा भागात गरजेनुसार नागरिकांच्या सुलभ दळणवळणाकरिता पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात यावीत, असेही सूचित केले आहे.

फाटकमुक्त प्रकल्पात मुंबई महानगर प्रदेशात १७, पुण्यात १५. नागपुरात १३, नाशिक आणि अमरावतीमध्ये प्रत्येकी ५, तर उर्वरित प्रकल्प छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, लातूर, परभणी, अहिल्यानगर आणि नादेड या जिल्ह्यांमध्ये नियोजित आहेत.

 कळंबस्ते फाटक मृत्यूचा सापळा कळंबस्ते रेल्वे फाटक (चिपळूण) हे सध्या अपघातांचे प्रमुख केंद्र आणि 'मृत्यूचा सापळा' बनले आहे. या परिसरातील वाढता वाहतूक कोंडीचा प्रश्न आणि रेल्वे प्रशासनाच्या काही तांत्रिक त्रुटींमुळे फाटक बंद न होताच गाड्या जाणे अशा कारणाने येथे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असते. हे फाटक खेड हद्दीतील पंधरागाव विभागाला जोडणारा एकमेव प्रमुख मार्ग आहे. काही

तांत्रिक अडचणींमुळे कळंबस्ते येथे फाटक बंद न होताच भरधाव वेगाने गाड्या निघून गेल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. गेल्यावर्षी प्रयागराज एक्सप्रेसबाबतीत घडलेल्या घटनेने ही गंभीर बाब समोर आली होती. गेली अनेक वर्षे या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 'कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती' देखील या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. परिसरातील वाढती रहदारी पाहता, सुरक्षेच्या दृष्टीने येथे तत्काळ उपाययोजना न केल्यास कधीही मोठी दुर्घटना घडू शकते. या जीवघेण्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे.

चौकट

रेल्वेकडून सातत्याने अन्यायच 

कळंबस्ते येथील फाटक मृत्यूचा सापळा ठरला आहे. आम्ही येथे उड्डाणपूल व्हावा, म्हणून गेली 23 वर्षे शासनदरबारी प्रस्ताव पाठविले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा केला आहे. मात्र, शासनाकडून अद्यापही ही मागणी पूर्ण झालेली नसून मुख्यमंत्र्यांच्या रेल्वे फाटकमुक्त योजनेत हे काम प्राधान्याने घ्यावे, अशी आमची मागणी आहे.

शौकत मुकादम 


Comments