खतटंचाईने शेतकरी हवालदिल

चिपळूणमध्ये महाविकास आघाडीची एकजूट, 

प्रशासनाला ठणकावले निवेदन




चिपळूण : खरीप हंगामाच्या तोंडावरच चिपळूण तालुक्यात निर्माण झालेल्या तीव्र खतटंचाईमुळे शेतकरी अक्षरशः संकटाच्या खाईत लोटले गेले आहेत. उशिरा सुरू झालेल्या पावसाने आधीच चिंतेत असलेल्या शेतकरी बांधवांनी पाऊस सुरू होताच मोठ्या आशेने पेरणी आणि शेतीकामांना सुरुवात केली मात्र याच निर्णायक टप्प्यावर युरिया, डीएपी, एनपीके यांसारख्या अत्यावश्यक खतांचा तुटवडा आणि दुबार पेरणीसाठी आवश्यक बियाण्यांची अनुपलब्धता यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडण्याची वेळ आली आहे. या गंभीर प्रश्नावर शासन आणि प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि इंदिरा काँग्रेस या महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी आज चिपळूण येथील तहसीलदार कार्यालयावर एकत्र येत निवेदन दिले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने यापूर्वी सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी प्रशासनाच्या दारात ठामपणे उभे राहिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करता त्यांच्या अडचणीला प्राधान्य देत महाविकास आघाडीने दाखविलेली ही एकजूट लक्षवेधी ठरली.

महाविकास आघाडीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये खतांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोज खत केंद्रांवर फेऱ्या माराव्या लागत आहेत. तासन्तास रांगेत उभे राहूनही हाती काहीच लागत नसल्याने शेतकरी हताश होत आहेत. पावसाचा हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची धावपळ सुरू केली असताना खत विक्रीतील अडथळे आणि अपुरा पुरवठा ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले. काही ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजाराला खतपाणी मिळत असल्याच्या तक्रारीही पुढे येत असल्याने प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे अत्यावश्यक असल्याचे महाविकास आघाडीने बजावले.

महाविकास आघाडीने शासन व कृषी विभागाकडे काही ठोस मागण्या मांडल्या आहेत. तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात खतांचा तातडीने साठा उपलब्ध करून द्यावा, दुबार पेरणीसाठी आवश्यक बियाण्यांची त्वरित व्यवस्था करावी, खत वितरण प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवावे आणि कृत्रिम टंचाई तसेच काळाबाजार रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. “शेतकऱ्यांच्या जिवाशीt खेळणारी ही परिस्थिती असह्य आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली नाही, तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल,” असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात्मक निवेदनावेळी चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव (बाळा) कदम, ज्येष्ठ नेते सतीश आप्पा खेडेकर, जिल्हा उपाध्यक्ष दत्ताशेठ पवार, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुकाध्यक्ष राजेश केळसकर, तालुका कार्याध्यक्ष शिरीष काटकर, तालुकाध्यक्ष महादेव चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा दीपिका कोतवडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी, शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, शहराध्यक्ष समीर देसाई, शहराध्यक्ष व नगरसेवक साजिद सरगुरोह, शहराध्यक्ष मुन्ना जस्नाईक, शहरप्रमुख पार्थ जागुष्टे, महिला तालुकाध्यक्षा अरुता अडविलकर, महिला तालुका अध्यक्षा निर्मला जाधव, शहराध्यक्षा रुक्सार अल्वी, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष रईस अल्वी, तालुका उपाध्यक्ष मनोहर खेडेकर, उपशहर प्रमुख संजय रेडीज, राजू विखारे, मनोज पांचाळ, नगरसेविका वैशाली कदम, नसरीन खडस, मिस्बा असगर नाखुदा, माजी नगरसेविका सीमा चाळके, विभाग प्रमुख संतोष मिरगल, माजी शाखाप्रमुख विनायक वास्कर तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिपळूण तालुक्यातील शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करत आहेत. पावसाचा उशीर, वाढते उत्पादनखर्च, अनिश्चित बाजारभाव आणि आता त्यात भर म्हणून खत-बियाण्यांची टंचाई या सगळ्या कोंडीत शेतकरी सापडला असताना शासनाने आणि प्रशासनाने केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेऊ नये, अशी संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्याला वेळेवर खत आणि बियाणे मिळाले नाही, तर त्याचे नुकसान केवळ एका हंगामापुरते मर्यादित राहणार नाही तर त्याचा फटका संपूर्ण ग्रामीण अर्थचक्राला बसणार आहे. त्यामुळे चिपळूणमधील हा प्रश्न केवळ खतपुरवठ्याचा नसून, तो शेतकऱ्याच्या जगण्याशी आणि अन्नदात्याच्या अस्तित्वाशी निगडित असल्याचे महाविकास आघाडीने ठामपणे मांडले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकदिलाने लढण्याचा निर्धार व्यक्त करत महाविकास आघाडीने आज दिलेले हे निवेदन म्हणजे केवळ औपचारिकता नसून, प्रशासनाला दिलेला ठोस इशारा आहे. आता शासन आणि कृषी यंत्रणेने जागे होऊन तातडीची उपाययोजना करायची की शेतकऱ्यांचा आक्रोश अधिक तीव्र होऊ द्यायचा, याचा निर्णय त्यांच्या हाती आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही.

Comments