खेड तालुक्यात पाणी समस्या झाली गंभीर

तेरा गावे २८ वाड्यांना टंचाईची झळ



खेड : तालुक्यात उष्प्याने गेल्या काही दिवसांपासून कहरच केला आहे. उपलब्ध पाण्याचे जलस्रोत कोरडे पडल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी रणरणत्या उन्हात अक्षरशः भटकंतीच सुरू आहे. सद्यस्थितीत १३ गावे २८ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसली आहे. या गाव-वाड्यांतील १७५१ ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रोश करत आहेत. दिवसागणिक पाणीटंचाईचे संकट जटील बनत चालल्याने ग्रामस्थ पाणीटंचाईने अक्षरशः रडकुंडीसच आले आहेत. प्रशासनाचीही अपुऱ्या टैंकर अभावी तहानलेल्या गाव-वाड्यांना पाणीपुरवठा करताना दमछाकच होत आहे.

तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या स्थिरावली असली तरी सद्यस्थितीतील १३ गावे २८ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी अवघा एकच टैंकर उपलब्ध आहे. यामुळे एका टँकरच्या फेऱ्या तहानलेल्या गाव-वाड्यांमध्ये एक दिवसाआड पोहचत असल्या तरी ग्रामस्थांना टँकरची प्रतीक्षाच करावी लागत आहे. पर्यायाने मैलोनमैल भटकंती करून जेमतेम  मिळणाऱ्या पाण्यावर तहान शमवावी लागत आहे.

तालुक्यात १३ गावातील २८ वाड्यांमधील १७५१ ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडली आहे. शिर्शीतील ४ वाड्यांना सर्वाधिक पाणीटंचाईची झळ बसत असून ३४७ ग्रामस्थ पाण्यासाठी हंबरडा फोडत आहेत.

तालुक्यातील घेरारसाळगड-भराडे धनगरवाडी (९०), निमणी-धनगरवाडी (१६), कशेडी बंगला (५९), बोरटोक (३९), खवटी खालची धनगरवाडी (९०), वरची धनगरवाडी (५५), सवेणी-धनगरवाडी (३५), केळणे-भोसलेवाडी (३९), मांगलेवाडी (६७)  ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण करत आहेत.

तळे धनगवाडी (४२)' बौद्धवाडी (९५), पालांडेवाडी (३१), तिरंगी खांडेकरवाडी (९५), धनगरवाडी (८५), हुंबरी म्हाळुंगे धनगरवाडी (१७), तुळशी बुद्रुक कुबजई धनगरवाडी (७०) , शिर्शि चिनकटे वाडी (७०), गुरववाडी(९०), माळीवाडी(१००), चिंचवाडी (८७), कासई-बोरवाडी (१३६), बोरज-निगडे बारकोंबडा (७८), घेरारसाळगड-पाण्यासाठी तडफड सुरू आहे. ओझरवाडी (५०) ग्रामस्थांची पाण्यासाठी तडफड सुरू आहे. 

 येथील प्रशासनाकडून चोरद नदीपात्रातून एकदिवसाआड टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. एकच टैंकर उपलब्ध असल्याने आहे.  तहानलेल्या ग्रामस्थांना टँकरची प्रतीक्षाच करावी लागत आहे.  प्रशासनाची एका टँकरमुळे तहान शमवताना अक्षरशः दमछाकच होत आहे. पाऊस पडतोय कधी अन् पाणीटंचाई संपुष्टात येतेय कधी याचीच वाट ग्रामस्थ पहात आहेत. 

चौकट

आतापर्यंत साडेपाच लाख लिटर पाणी उपसा

तालुक्यात ९ एप्रिलपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत तहानलेल्या गाव-वाड्यांमध्ये ११३ फेऱ्या धावल्या आहेत. पंचायत समितीकडे ५ हजार लिटर क्षमतेचा एक शासकीय टैंकर आहे. याद्वारे सुकिवली येथील चोरद नदीपात्रातून आतापर्यंत ५ लाख ६० हजार लिटर पाणी उपसा करत तहानलेल्या गाव-वाड्यांची तहान शमवण्यात आली आहे.

Comments