पावसाचा लपंडाव कधी संपणार?

शेतकरी मनातून धास्तावले

आद्रा नक्षत्रातही कडक ऊन ; गेला पाऊस कुणीकडे..



चिपळूण  : यावर्षी पावसाची चिन्ह काहीशी वेगळी दिसत आहेत. मृग नक्षत्र पूर्णतः कोरडे गेले. आता आद्रा नक्षत्रामध्ये ही कडक ऊन पडत असल्याने शेतीची कामे होणार कशी ही चिंता बळीराजाला लागली आहे. आता पावसाळा कुठे पाहिले का? गेला पाऊस कुणीकडे अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगत आहे.

दरवर्षी मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात होते.  त्यामुळे शेतीची काम सुद्धा वेळच्यावेळी होत होती.  मात्र यावर्षी सारेच उलटे सुलटे झाले आहे.  शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर नंतर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेरणी उरकून घेतली. मुरगाचा पाऊस नेहमीप्रमाणे सुरू होईल असे शेतकऱ्यांना वाटले होते. मात्र मृगाचे नक्षत्र पूर्णतः कोरडे  गेले. त्यामुळे पेरलेल्या धान्यांना अंकुर फुटले नाहीत.  या नक्षत्रातील पंधरा दिवस अक्षरशः कडक   उन्हामध्ये गेले. त्यानंतर २२ जून रोजी पावसाचे आद्रा नक्षत्र सुरू झाले आणि पहिले दोन दिवस जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटलं की, आता पाऊस सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये  उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.  

परंतु,  ते दोन दिवस संपल्यानंतर पुन्हा आद्रा नक्षत्रातील आठ दिवस पूर्ण कडक ऊन  राहून पडत आहे. त्यामुळे शेतामध्ये अंकुर फुटलेले वापसे सुद्धा करपून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  पाण्याची टंचाई सुद्धा काही गावातून निर्माण झाली आहे. अशावेळी आता काय करावे..कसे जगावे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.  जरी पावसाचे आद्रा नक्षत्र  काही दिवसांमध्ये लागलेच नाही तर निश्चितच शेतीचे नुकसान होईल आणि ओला दुष्काळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोकणातील विशेषता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जुलै ऑगस्ट हे दोन महिने शेतीच्या कामासाठी फार महत्त्वाचे असतात. 


 या महिन्यांमध्ये पावसाचे तरणा पाऊस  नक्षत्र आणि म्हातारा पाऊस  नक्षत्र  यामध्ये उरली सुरली भात लावणीची कामे शेतकरी पुरी करत असतो.  मात्र अजून पुनर्वसु  नक्षत्र सुरू होण्यासाठी आठ दिवस उरलेले असताना शेतात पेरलेल्या धान्याला अंकुरच फुटत आहेत. त्यामुळे यावर्षी शेतीची कामे निश्चितच उशिरा होण्याची शकतात निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले जाणार आहे.  वापसे होणार कधी आणि लावणी लावणार कधी अशी चिंता  शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.  मात्र असे वातावरण  असताना सुद्धा  नाक्या नाक्यावर पावसाच्या चर्चा रंगत असून कोणी पावसाला पाहिले का?    गेला पाऊस कुणीकडे... अशा चर्चा सुद्धा आता रंगताना दिसत आहेत.

Comments