रस्त्याच्या कडेची धोकादायक झुडपे हटवण्यास सुरुवात 

 पंचायत समिती सदस्यांच्या पाठपुराव्याला यश



चिपळूण  : तालुक्यातील मुख्य रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे वाढल्याने वाहनचालकांना समोरचे दिसत नसल्याने  दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. याची दखल  पंचायत समिती सदस्य व गटनेते गौरव पाटेकर यांनी पंचायत समिती सदस्या सौ. वाजे व सौ. सुप्रिया वंजारे यांच्या समवेत पंचायत समितीच्या मागील दोन सर्वसाधारण सभांमध्ये हा विषय गांभीर्याने लावून धरला होता. त्यामुळे आता रस्त्यांच्या कडेची झाडेझुडपे तोडण्याचे कामे सुरू झाले आहे. सदस्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

वरील सदस्यांनी रोज होणाऱ्या अपघातांचे दाखले देत त्यांनी संबंधित अधिकारी वर्गाला जाब विचारला व तातडीने कार्यवाही करण्याची मागणी लावून धरली. सर्वच मुख्य रस्त्यांच्या कडेला झाडे झुडपे वाढली आहेत. त्यामुळे पटकन समोरील वाहन दिसत नाही. काही वेळा वळणावर वाहन समोर येते आणि वाहनचालकांची तारांबळ उडते. त्यामुळेच अपघात होतात. हा प्रश्न पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्य गौरव पाटेकर यांनी मांडून त्याची सत्यता पटवून दिली. याला सदस्या सौ. वाजे आणि सुप्रिया वंजारे यांनी साथ दिली. 

सदस्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत रस्त्याच्या कडेची झाडी-झुडपे जेसीबीच्या  सहाय्याने साफ करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे अपघातांना आळा बसून नागरिकांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.

यावेळी गौरव पाटेकर म्हणाले की, जनतेच्या जीविताचे रक्षण ही आमची प्राथमिकता आहे. रस्ते चांगले तर प्रवास सुखकर होईल. त्यामुळे जनतेच्या हिताकडे आमचे कायम लक्ष राहील.  विकासकामांसाठी आम्ही असेच कटिबद्ध राहू, असे त्यांनी सांगितले.

Comments