जीवनात सृजनशील माणूस बनून आयुष्य प्रेरणादायी बनवा - डॉ कमलताई ठकार 

मराठा मंडळ मुलुंड येथे व्याख्यानातून केले श्रोत्यांना मंत्रमुग्ध


मुंबई : दुसऱ्यावर प्रेम करणे म्हणजे स्वतःला परिपूर्ण करणे होय. दुसऱ्यावर प्रेम करताना स्वतःच्या मनातील द्वेष आणि तिरस्काराची भावना गळून पडते. यातूनच परोपकाराची भावना निर्माण होते आणि जीवन समृद्ध होते. म्हणून जीवन मोठे करण्यापेक्षा जीवनात एक चांगला माणूस बना, असे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ प्राचार्या डॉ कमलताई ठाकर यांनी आदर्श जीवन शैलीचे विचार व्यक्त केले.

मराठा मंडळ मुलुंड येथे दिनांक २१ रोजी सायंकाळी ५ वाजता  साने गुरुजींच्या ७६ व्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ प्राचार्या डॉ कमलताई ठकार प्राचार्या डॉ. कमलताई ठकार यांचे "मातृसंस्कृती आणि साने गुरुजी" या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमात पुढे बोलताना डॉ कमलताई ठकार म्हणाल्या की,  "दुसऱ्यावर प्रेम करणे म्हणजे स्वतःला पूर्ण करणे". म्हणजेच दुसऱ्यावर प्रेम करत असताना आपल्या मनातील द्वेष आणि तिरस्कार कमी होत जातो, हे त्यांनी सांगितले. "ज्ञानाचा नेहमी आधार असावा, ओझे असू नये" हा विचार ज्ञानाकडे पाहण्याची नवी दृष्टी देऊन गेला. "व्यक्तीच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करावा कारण त्यांच्या जीवनाची संपूर्ण तपस्या आणि साधना त्यांच्या पायात असते" तसेच "जीवनात मोठे होणे महत्त्वाचे नाही तर जीवनात माणूस होणे महत्त्वाचे आहे" हा त्यांनी दिलेला संदेश मनाला अंतर्मुख करणारा होता. "सत्कार करणारा मोठा नाही, सत्कार करवून घेणारा मोठा नाही, तर सत्कार पाहणारा मोठा असतो, कारण दुसऱ्यांचे भले होताना आनंदाने पाहणारे डोळे हेच खरे मोठे असतात" हा विचार कमलताई ठकार यांनी मांडला. आपले जीवन हे रांगोळी सारखे असते. रांगोळी खूप सुंदर असते, तिच्यात अनेक रंग भरले जातात. परंतु ती कायमची राहत नाही. ती शाश्वत नाही. ती पुसावी लागते. तसेच आपले जीवनही शाश्वत नाही." या साध्या उदाहरणातून जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांनी सहज उलगडून दाखवले. अशा अनेक अनेक विचारांची पेरणी कमलताईंनी आपल्या व्याख्यानातून केली.

स्वामी विवेकानंद, पूज्य साने गुरुजी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा गाढा अभ्यास असलेल्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा आझाद महाविद्यालय - औसा, लातूरच्या भूतपूर्व प्राचार्या डॉ. कमलताई ठकार यांच्या "मातृसंस्कृती आणि पूज्य साने गुरुजी" या विषयावरील या व्याख्यानात मातृसंस्कारांचे महत्त्व, भारतीय संस्कृतीची मूल्यपरंपरा आणि पूज्य साने गुरुजी यांच्या जीवनातून व विचारांतून समाजाला मिळणारी प्रेरणा यांचा वेध घेतला गेला. वयाची ७८ वर्षे पूर्ण केलेल्या कमलताईंनी तब्बल एक तास वीस मिनिटे कोणताही कागद समोर नसताना, कोणत्याही टिपणांचा आधार न घेता आणि कुठेही न अडखळता अत्यंत ओघवत्या शैलीत विचार मांडले. त्यांच्या प्रत्येक वाक्यात शब्दांची समृद्धी जाणवत होती. 

आज डॉ. कमलताई ठकार यांचे "मातृसंस्कृती आणि साने गुरुजी" या विषयावरील व्याख्यान ऐकताना असे वाटले की हे केवळ व्याख्यान नसून एक प्रकारचे समुपदेशन, निरूपण आणि आत्मपरीक्षणच आहे. व्याख्यानात उल्लेख आलेल्या अनेक महान व्यक्तींच्या आईप्रमाणे, कमलताईंनीही आपल्या वाणीतून आमच्यावर आज आईप्रमाणे संस्कार केले. त्यांनी उलगडून दाखवलेली मातृसंस्कृतीची मूल्ये आणि पूज्य साने गुरुजींचे विचार आमच्या सर्वांच्या मनावर व कायमचा ठसा उमटवून गेले. आज आम्ही खऱ्या अर्थाने समृद्ध झालो", अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित असलेले मराठा मंडळ मुलुंडचे अध्यक्ष रमेश शिर्के यांनी यानिमित्ताने दिली.  या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Comments