देवरूख बोटकेवाडीतील संरक्षण भिंतीचे काम पूर्ण

आमदार शेखर निकम यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीची पुन्हा झलक 



देवरूख :  संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरातील बोटकेवाडी परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार शेखर निकम यांनी तातडीने निधी मंजूर करून चोरपऱ्या संरक्षण भिंतीचे काम पूर्णत्वास नेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

देवरुख येथील श्री सोळजाई नवतरुण मित्रमंडळ, बोटकेवाडी यांनी ११ जानेवारी २०२५ रोजी आमदार शेखर निकम यांना निवेदन सादर करून बोटकेवाडी परिसरात चोरपऱ्या काठावर संरक्षण भिंत उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या निवेदनात परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मांडण्यात आला होता. विशेषतः पावसाळ्यात होणारी मातीची धूप, रस्त्याला निर्माण होणारा धोका तसेच नागरिकांच्या जीवितास निर्माण होणाऱ्या संभाव्य संकटाची जाणीव करून देण्यात आली होती. निवेदनाची गांभीर्याने दखल घेत आमदार शेखर निकम यांनी संबंधित विभागांशी पाठपुरावा करून आवश्यक निधी मंजूर केला. त्यानंतर अल्पावधीतच संरक्षण भिंतीचे काम हाती घेण्यात आले आणि आज हे काम पूर्णत्वास पोहोचले आहे. मजबूत व दर्जेदार संरक्षण भिंत उभारण्यात आल्याने परिसरातील रस्ता सुरक्षित झाला असून भविष्यातील संभाव्य नुकसान टाळण्यास मोठी मदत होणार आहे. या कामामुळे बोटकेवाडी परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला आहे. विशेष म्हणजे केवळ आश्वासने न देता नागरिकांच्या मागण्यांची तातडीने पूर्तता करण्याची आमदार शेखर निकम यांची कार्यशैली या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 


Comments