मिरगाची राखण बेतते  कोंबड्याच्या जीवावर  

शेतकरी दादा तुमच्या राखणेपायी माझा बळी का? 




चिपळूण :  पावसाचे मृग नक्षत्र आणि मिरगाची राखण यांचा कोकणातील शेतीशी अगदी भावनिक संबंध आहे.  मिरगात शेतीच्या कामाला सुरुवात होते आणि त्याचवेळी शेतकरी राखण देतो. मात्र ही राखण देताना कोंबड्यांचा बळी देण्याची पद्धत गेली अनेक वर्षे आहे. मात्र, या राखण पद्धतीत माझाच बळी का? हे मृग नक्षत्र आमच्या जीवावर बेतते. त्यामुळे या राखणपायी बिचाऱ्या कोंबडाचा बळी जातो याचे कोडे अजूनही त्यांना पडलेले आहे. शेतकरी दादा तुमच्या राखणे पायी आमचा बळी देऊ नका.. अशी साद आता कोंबडा घालत आहे.

गेली अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने शेती करणे आणि मिरगात शेतीची राखण देणे ही प्रथा सुरू आहे. यामध्ये एक भावनिक गुंता दिसून येतो. मात्र, यात कोंबड्यांचा जीव जातो. त्याच्या शिवाय ही तिखटी राखण पूर्णच होऊ शकत नाही.

     मृग नक्षत्र आणि राखण पद्धत यांचा विशेषतः कोकणातील शेती संस्कृतीशी अत्यंत जवळचा आणि भावनिक संबंध आहे. मृग नक्षत्र सुरू होताच शेतीच्या कामांना सुरुवात होते. या पर्वात कोकणात मिरगाची राखण किंवा आगोट अशी एक पारंपरिक पद्धत आहे. ज्यामध्ये पावसाची व धरणीमातेची कृपा आपल्यावर राहावी म्हणून बळीराजा याचना करीत असतो.  

मृग नक्षत्राचा कालावधी हा जून महिन्याच्या  ७ तारखेपासून सुरू होतो. या नक्षत्रापासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होते.मृग नक्षत्र सुरू होताच शेतकरी शेताची कामे सुरू  करतो. त्याआधी पेरणी झालेली असते.  मात्र, मिरुग नक्षत्र लागले की, बळीराजा राखण देण्याच्या तयारीला लागतो.  ही राखण दिल्याशिवाय शेतीची पुढील कामे सुरू होतच नाही. परंतु, या राखणेसाठी गावठी कोंबडा लागतो.  ज्यांची तिखटी राखण आहे त्यांना कोंबड्यांचा बळी द्यावा लागतो. 

शेती करताना कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये, पाळीव प्राण्यांचे रक्षण व्हावे आणि पीक चांगले यावे, यासाठी राखण दिली जाते. याचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक तिखटी राखण आणि दुसरी गोडी राखण.  तिखटी राखण पद्धतीमध्ये गावचे राखणदार क्षेत्रपाल, वेताळ, देवचार यांना कोंबड्याचा बळी देण्याची जुनी परंपरा आहे.कोंबडा शिजवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि घरातील सर्वजण एकत्र जेवतात.  तर गोडी  राखण या प्रकारात भेंड्याचा देठ कापून बळी दिला जातो. राखण देताना शेतकरी निसर्गाला साद घालतो. अशी प्रथा खूप वर्षांपासून आहे. मात्र यात कोंबड्यांचा जीव जातो. हे सुद्धा तेवढेच खरे आहे. 

मृग नक्षत्र आले बिचाऱ्या कोंबड्याच्या मनात धडधड सुरू होते.  कधी आपलं बळी जाईल याची चिंता त्याला असते. राखण कोणाची आणि बळी कोणाचा असा प्रश्न त्याला पडत असेल. परंतु बिचारा माणसापुढे तो काहीच करू शकत नाही.  पण दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार व्हायला पाहिजे. कारण या पारंपरिक पद्धतीमुळे दरवर्षी कोंबड्यांचा बळी जातो. कोंबड्याच्या बळी शिवाय ही राखण पूर्ण होऊ शकते का? या वर विचार होणे गरजेचे आहे.


शेतकरी दादा, अरे राखण्यासाठी आमचाच बळी का?

 आता कोंबड्याला प्रश्न पडला आहे की, शेतकऱ्यांच्या राखण्यासाठी आमचाच बळी दरवर्षी का देता. एरवी आमचे पालन करता आणि मिरगात आमचा बळी देता. याच आम्ही संपलो... आता आमचा बळी थांबवा. असे कोंबड्याला वाटू लागले आहे.

Comments