गेली ४५ वर्षे तहानलेल्याना पाणी पाजण्याचा सेवाधर्म
डेरवण येथील श्री संत सिताराम बुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
चिपळूण : कोकणात उन्हाळा सुरू झाला की, अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट डोके वर काढते, विहीरी आटू लागतात, पाण्याचे स्रोत कमी होतात आणि ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत डेरवण पंचक्रोशीतील नागरिकांसाठी गेली तब्बल ४५ वर्षे आधारवड ठरलेल्या श्री संत सीताराम बुबा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टने यंदाही आपल्या सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम ठेवत पाणीटंचाईग्रस्त गावांना मोफत पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे.
वालावलकर ट्रस्टचा १९८० मध्ये सुरू झालेला हा उपक्रम आजही तेवढ्याच तळमळीने आणि सातत्याने सुरू आहे. दरवर्षी मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या तीव्र कालावधीत ट्रस्टच्या माध्यमातून डेरवण परिसरातील अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पिण्याचे पाणी पोहोचवले जाते. यावर्षीही ट्रस्टने संपूर्ण पंचक्रोशीतील गावांच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन व्यापक नियोजन केले आहे.
पाणीपुरवठ्यासाठी ट्रस्टचे स्वतःचे दोन टैंकर कार्यरत असून गरजेनुसार खासगी तत्त्वावर आणखी एक टैंकर भाड्याने घेतला जातो. या तीन टैंकरच्या साहाय्याने दररोज सुमारे २५ हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. आंबतखोल आणि दहिवली परिसरातील उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी उचलून ते विविध गावांतील नागरिकांपर्यंत पोहोचवले जाते. काही ठिकाणी गावकऱ्यांच्या मागणीनुसार थेट विहिरींमध्ये पाणी सोडून स्थानिक पाणीपुरवठा व्यवस्थेलाही आधार दिला आहे.
तीन महिण्यांसाठी सुमारे पंधरा लाखांचा खर्च
या उपक्रमासाठी संस्थेला दरवर्षी मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. यंदा केवळ तीन महिन्यांच्या पाणीपुरवठ्यासाठी सुमारे पंधरा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा संपूर्ण खर्च ट्रस्टच्या माध्यमातून केला जात आहे.
कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता ग्रामस्थांना मोफत आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे वालावलकर ट्रस्टचे कार्य केवळ पाणीपुरवठ्यापुरते मर्यादित नाही. आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास आणि सामाजिक क्षेत्रातही संस्था अनेक वर्षांपासून विविध लोकहिताचे उपक्रम राबवत आहे. मात्र उन्हाळ्यातील पाणीपुरवठा हा उपक्रम पंचक्रोशीतील हजारो नागरिकांसाठी जीवनदायी ठरत असल्याने ग्रामस्थांकडून संस्थेबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील वाढती पाणीटंचाई आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांनी अशा प्रकारे पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे मतही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वालावलकर ट्रस्टच्या या सातत्यपूर्ण सेवेमुळे डेरवण पंचक्रोशीतील अनेक
गावांना दरवर्षी मोठा दिलासा मिळत असून मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य प्रत्यक्ष कृतीतून साकार होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
चौकट
शुद्ध पाणी देणे हाच आमचा हेतू
मानवसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन आमची संस्था गेले अनेक वर्षे समाजकार्य करत आहे. उन्हाळ्यात ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते. अशा वेळी नागरिकांना केवळ सरकार यंत्रणावर अवलंबून राहावे लागू नये म्हणून संस्था पुढाकार घेते. आमचा उद्देश केवळ पाणी पुरवणे नसून शुद्ध आणि पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देणे हा आहे.
विकास वालावलकर विश्वस्त श्री संत सिताराम बुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट, डेरवण

Comments
Post a Comment