घोणसरे येथे काटकर कुळ संमेलनात नाशिक, मुंबई, ठाणे, कल्याण,चिकोडी,रत्नागिरी, दापोली,दाभोळ, इस्लामपूर बंधू भगिनी सहभागी


चिपळूण : स्वकुळ साळी समाजातील प्रतिष्ठित काटकर कुळाचे कुलसंमेलन घोणसरे येथील खातुवाडा या पारंपरिक वास्तूमध्ये दि. ६ व ७ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या संमेलनासाठी नाशिक,मुंबई, ठाणे,कल्याण,चिकोडी,रत्नागिरी, दापोली,दाभोळ, इस्लामपूर व चिपळूण येथून मोठ्या संख्येने काटकर कुळातील बंधू-भगिनी उपस्थित होते.

संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ बांधव शत्रुघ्नजी काटकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.ज्येष्ठ समाजसेवक डी.जी. निमकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले,तर स्वकुळ साळी समाज रत्नागिरी जिल्हाध्यक्ष शिरीषजी काटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

पहिल्या दिवशी उपस्थितांची ओळख,सामूहिक भोजन तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.महिलांसाठी शिवाजी मालवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धात्मक खेळ घेण्यात आले. या उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सायंकाळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात समाजातील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.राजन गोंधळी यांनी जादूचे प्रयोग सादर केले.मयुरी काटकर व तिची कन्या जिजा यांनी नृत्याविष्कार सादर केला.विकास ढवण गुरुजी यांच्या एकपात्री अभिनयाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.राष्ट्रपाल सावंत यांनी राष्ट्रभक्तीपर गीत सादर केले, तर स्थानिक लोककलावंत योगेश बांडागळे यांनी संगमेश्वरी बोलीतून कोकणातील जीवनसंस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविले. या कार्यक्रमांमुळे वातावरणात उत्साहाचे रंग भरले.

दुसऱ्या दिवशी कुळाचा इतिहास, समाजातील महापुरुषांचे कार्य व त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव यावर मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर सर्व सहभागींची मनोगते झाली. "एकमेकांना हृदयाशी भेट करणारा दिंडी चालली" या भावगीताच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना खडीसाखर भरवत आयोजित करण्यात आलेल्या दिंडी कार्यक्रमाने भावनिक वातावरण निर्माण झाले. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

चांगल्या वातावरणात संमेलनाची सांगता झाली. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी शिरीषजी काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास ढवण गुरुजी, मिलिंद काटकर, अमृत काटकर, प्रवीण काटकर गुरुजी तसेच काटकर कुटुंबीयांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या नीलम गोंधळी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक घटे गुरुजी, नगरसेविका वैशाली निमकर, किशोर तांबडे आणि अनंत निमकर यांनी सदिच्छा भेट देऊन संमेलनास शुभेच्छा दिलल्या.

Comments