कोंढे येथे डीपीमधील स्पार्किंगमुळे आग : ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
महावितरणच्या डीपीबाबत वारंवार तक्रारी : ग्रामस्थांमध्ये संताप
चिपळूण : तालुक्यातील कोंढे शाळा स्टॉपसमोर सोमवारी दुपारच्या सुमारास विद्युत डीपीमधून अचानक स्पार्किंग होऊन सुक्या गवताला आग लागल्याची घटना घडली. आग वेगाने पसरू लागल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तात्काळ चिपळूण नगर पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिल्याने आग नियंत्रणात आली आणि मोठा अनर्थ टळला.
कोंढे येथे स्व. सुनिल मिरगल यांच्या मालकीची जागा अनेक वर्षांपासून ओसाड अवस्थेत आहे. पूर्वी या ठिकाणी भात गिरणी कार्यरत होती, मात्र सध्या ती बंद असून परिसरात मोठ्या प्रमाणात गवत व झाडीझुडपे वाढली आहेत. गेल्या काही वर्षांत जागेची साफसफाई न झाल्याने मोठ्या प्रमाणात सुक्या गवताचा साठा निर्माण झाला होता.
याच जागेमध्ये कोंढे गावासाठीचा महावितरणचा विद्युत डीपी उभारण्यात आला आहे. दुपारच्या वेळी डीपीमधून अचानक स्पार्किंग सुरू झाले आणि त्यातून निघालेल्या ठिणग्यांमुळे परिसरातील सुक्या गवताने पेट घेतला. काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले. आग वाढत असल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ चिपळूण नगर पालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला.
अग्निशमन दलाची गाडी वेळेत घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. अन्यथा आगीचा भडका उडून आसपासच्या रहिवासी घरांना तसेच कोंढे बौद्धवाडी परिसराला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवित व वित्तहानी टळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, संबंधित विद्युत डीपीमधून वारंवार स्पार्किंग होत असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही महावितरणच्या चिपळूण कार्यालयाकडे अनेकदा तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र त्यावर कोणतीही प्रभावी कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
आज घडलेल्या घटनेनंतर नागरिकांनी महावितरणच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून अशा धोकादायक डीपीची तातडीने दुरुस्ती करून परिसरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
अग्निशमन दलाचे कौतुक
घटनास्थळी चिपळूण नगर पालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी तातडीने पोहोचल्यामुळे आग नियंत्रणात आणणे शक्य झाले. ग्रामस्थांनी अग्निशमन दलाच्या तत्परतेचे कौतुक करत त्यांच्या जलद प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त केली.

Comments
Post a Comment