चिवेली आदर्श विद्य मंदिरात स्व. गोविंदराव शिर्के यांचा २८ वा स्मृतिदिन साजरा
स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचे वाट
चिपळूण : तालुक्यातील चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ संचालित आदर्श विद्यामंदिर चिवेली येथे स्वर्गीय गोविंदराव शिर्के यांचा २८ वा स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेश शिर्के होते.
शाळेच्या सभागृहामध्ये प्रथम स्व. गोविंदराव शिर्के यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी स्व. शिर्के यांचे नातू अजित साळवी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना स्व. गोविंदराव शिर्के यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर संस्थेचे पदाधिकारी मोहन शिर्के यांनीही सांगितले की, स्व. गोविंदराव शिर्के यांच्या सहवासात जे राहिले त्यांच्यामध्ये सामाजिक कार्याचे गुण आजही दिसून येतात. त्यांनी अनेक माणसं घडविली आहेत. जी सामाजिक क्षेत्रात आजही काम करताना दिसतात. त्यांनी मुंबईत असताना गावच्या विकासाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले होते, म्हणूनच आज प्रत्येक कार्यक्रमांमध्ये त्यांची आवर्जून आठवण काढली जाते असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर शालेय समितीचे चेअरमन ॲड. भाई कुळे यांनी सांगितले की, अथांग सागरासारखे ज्यांचे व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्या जिद्दीला गरुडाच्या पंखाची ताकद होती असे स्व. गोविंदराव शिर्के होते. आज जरी आपल्यामध्ये ते नसले तरी त्यांनी केलेल्या कार्यामुळे नेहमीच प्रत्येकाच्या मनात ते कायम राहणार आहेत. त्यांनी वैचारिक वारसा जपून सामाजिक जडणघडणीला एक नवीन आयाम दिला. असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये असताना गटनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष पद भूषवली होते. मात्र आपल्या गावाशी जोडलेली नाळ कायम ठेवत त्यांनी चिवेली गावाच्या विकासात बहुमोल योगदान दिले आहे . असे त्यांनी बोलताना सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष यांनी सुद्धा बोलताना स्व. गोविंदराव शिर्के यांच्या कार्यावरती प्रकाश टाकला. त्यांनी जुन्या आठवणी सांगत अनेक गोष्टी कथन केल्या. त्याचबरोबर त्यांनी गावातील सध्याची राजकीय आणि सामाजिक जी स्थिती आहे, त्यावरती भाष्य केले. ते म्हणाले की, गोविंदरावांचा आदर्श घेत जर गावातील सगळे तरुण एकत्र आले तर निश्चितच मोठी कामगिरी किंवा कार्य घडू शकते. राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी शैक्षणिक किंवा समाजकार्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय चव्हाण यांनी केले. यावेळी इयत्ता दहावी मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यामध्ये निखिल जाधव, मृणाली गुजर आणि जान्हवी शिगवण या तिघांनाही पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी दरवर्षी प्रमाणे डॉ विजय शिर्के हे स्व. गोविंदराव शिर्के यांच्या आठवणी खातर मुलांना शैक्षणिक साहित्य देतात. त्याचे ही वाटप करण्यात आले. त्याचबरोबर सेवा साधना प्रतिष्ठानचे विनीत वाघे यांनी ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष राजेश शिर्के, संस्थेचे पदाधिकारी मोहन शिर्के, शालेय समितीचे चेअरमन ॲड. भाई कुळे, स्थानिक समितीचे अध्यक्ष सुभाष शिर्के, शाळेचे मुख्याध्यापक संजय चव्हाण , शालेय समिती सदस्य सुरेश बंगाल, सेवा साधना प्रतिष्ठानचे विनीत वाघे अजित साळवी, महेश चव्हाण, राजेंद्र शिर्के, मुरलीधर बामणे, प्रदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद कर्मचारी आणि पालक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गुरव तर आभार रियाज अत्तार यांनी मानले.

Comments
Post a Comment