पावसाचा जोर वाढला
शेतीच्या कामाला सुरुवात; बळीराजा सुखावला
चिपळूण : दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. आद्रा नक्षत्रातील शेवटच्या दिवसांमध्ये पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. बळीराजा शेतात काम करण्यात मग्न असून पाऊस पडल्यामुळे तो सुखावला आहे.
शनिवारपासून पावसाने जोर धरला आहे . पाऊस थोडीशी विश्रांती घेतो आणि मग पुन्हा मुसळधार पाऊस पडतो. गेले महिनाभर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतीचे यावर्षी काय होणार अशी चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली होती. मात्र आता आद्रा नक्षत्रातील शेवटच्या दिवसांमध्ये पावसाने जोरदार आगमन केले आहे. मुसळधार पाऊस सतत पडत आहे. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतीचे कामे सुद्धा होत आहेत. शेतकरी आपल्या शेतात फोडीला सुरुवात करून लवकरात लवकर नांगरणीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र अजून पेरलेले धान्य चांगल्या प्रकारे उगवली नसल्यामुळे लावणीला थोडा उशीरच होणार आहे. परंतु पाऊस पडत असल्यामुळे शेतीची काम आता सुरू झालेली आहेत. त्यामुळे बळीराजा मनातून सुखावला आहे.

Comments
Post a Comment