खेर्डीतील शासकीय वसतिगृहाचे स्थलांतर रोखले 

विद्यार्थी नसल्याचे कारण देत समाजकल्याणकडून स्थलांतरा घाट  

विविध संघटनांया आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन नमले 




चिपळूण  : तालुक्यातील  समाजकल्याण विभागाच्या खेर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात विद्यार्थी नसल्याची खोटी माहिती देत हे वसतिगृह स्थलांतरीत करण्याचा घाट प्रशासनाकडून घातला गेल्यानंतर विविध संघटना आक्रमक झाल्या. याप्रश्नी सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, भिमसैनिक युवा प्रतिष्ठानसह ठाकरे सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यानी वसतिगृहावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.  त्यामुळे तूर्तास खेर्डी येथेच हे वसतिगृह सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र या संदर्भात येत्या दोन दिवसांत समाजकल्याण विभाग आयुक्तांसमवेत स्वतंत्र बैठक होणार आहे.  

  खेर्डी येथे अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे हे शासकीय वसतिगृह अनेक विद्यार्थ्यांना आधार बनले आहे. कित्येक वर्षे एका भाड्याचा इमारतीत असलेल्या या वसतिगृहाची देखभालसह भेडसावणारे पश्न मार्गी लावावेत याबाबत अनेकदा समाज कल्याण विभागाला विविध संघटनांकडून निवेदन देत पाठपुरावा करण्यात आला. मात्र आजतागायत याबाबत समाजकल्याण विभागीय अधिकाऱ्यांनी  पुरेसे लक्ष दिलेले नाही. एकीकडे विविध प्रश्न भेडसावत असताना आता या वसतिगृहात चक्क विद्यार्था नसल्याची खोटी माहिती देत हे वसतिगृह स्थालांतरित केले जात असल्या आरोप संघटनांनी केला आहे. 

 यासंदर्भात शुकवारी वसतिगृहातील साहित्य ट्रकमधून स्थलांतरित जागी नेण्या खटाटोप सुरू असल्याचा प्रकार सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱयांना समजताच त्यांनी थेट वसतिगृह गाठत साहित्याने भरलेला ट्रक थांबवला. त्याच दरम्यान, वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, भीमसैनिक युवा प्रतिष्ठान आणि ठाकरे शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने वसतिगृहात दाखल झाले. या सर्वांनी उपस्थित अधिकाऱयांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. यावेळी गृहपाल घटनास्थळी येताच त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरु केला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतरही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी देखील प्रशासनास वसतिगृहाचे स्थलांतर न करण्याच्या सूचना केल्या.  

 अखेर कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन देखील नमले. ट्रकमध्ये भरलेले साहित्य देखील पुन्हा वसतिगृहात आणण्यात आले. त्याबरोबर खेर्डी येथेच हे वसतिगृह सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. तसेच वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सुरू ठेवण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले. दरम्यान, या संदर्भात येत्या दोन दिवसात समाजकल्याण विभागाच्या आयुक्तासमवेत एक बैठक घेतली जाणार असून त्यात प्रवेश प्रकिया, वसतिगृहातील पश्न तसेच अन्य सुविधासंदर्भात चर्चा केली जाणार आहे.   

   यावेळी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य सुभाष जाधव, गटनेते गौरव पाटेकर, सदस्या सुप्रिया वंजारे, संजीवनी खापरे, सायली वाजे, वंचितचे तालुका अध्यक्ष संदीप गमरे, महासचिव संदेश कदम, कामगार नेते विनोद कदम, माजी तालुका महासचिव संजय कदम, भारतीय बौद्ध महासभेचे राजू जाधव, तसेच युवा नेते सुमेध जाधव, आकाश कांबळे, अजय मोहिते, रोहित कदम, नितेश कदम आदी उपस्थित होते.

Comments