मान्सून लवकरच केरळात धडकणार; राज्यात जोरदार पाऊस बरसणार; हवामान विभागाचा इशारा
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संध्याकाळच्या वेळी होणाऱ्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, मुख्य मान्सूनचा अंदाजही हवामान विभागाने कायम ठेवला आहे. तसेच पुढील 24 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे उकाड्या पासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा, विदर्भ कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाची दमदार हजेरी लागणार असून राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे. पुढील सहा ते सात दिवसांत केरळमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यावेळी उत्तर-पश्चिम, मध्य, पूर्व भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांत मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांच्या पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांतही पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Comments
Post a Comment