चिपळूण तालुक्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी  ९० हजार ४५३ मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप 

१५  हजार ६३१ विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके; मुलांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद



संतोष कुळे 

चिपळूण : शाळेची घंटा सोमवार दिनांक १५ जून रोजी वाजली आणि पुन्हा एकदा शाळेमध्ये मुलांचा किलबिलाट सुरू झाला.  या सर्व मुलांना शासनाच्या वतीने पहिल्याच दिवशी  मोफत पाठ्यपुस्तक सुद्धा देण्यात आली.  यामध्ये चिपळूण तालुक्यातील १५ हजार ६३१ विद्यार्थ्यांना ९० हजार ४५३ पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. अजून  ६ हजार ८९० पुस्तके इयत्ता सहावीसाठी मराठी व उर्दू यांची येणे बाकी आहे.  पहिल्याच दिवशी पुस्तके मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.

दरवर्षी शासनाच्या मार्फत मुलांना मोफत पाठ्यपुस्तक आणि गणवेश दिले जातात. शासनाच्यावतीने समग्र शिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेच्या माध्यमातून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना करण्यात येते. 

 चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या  ३११ शाळा आणि हायस्कूल मधील इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंत ५६ शाळा असून या शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील १५ हजार  ६३१ विद्यार्थ्यांना ९० हजार ४५३ एवढी पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून त्यांचे वाटप करण्यात आले.  तालुक्यासाठी ९७ हजार ३४२ पाठ्यपुस्तकांची मागणी आहे. परंतु त्यापैकी अजून ६ हजार ८९०  पुस्तके घेणे बाकी आहे. त्यामध्ये इयत्ता ६ ची कला आणि शारीरिक शिक्षण विषयाची पुस्तके आणि उर्दू भाषेची पुस्तके प्राप्त होणे बाकी आहेत.  ती लवकरच शाळेमध्ये पोच होतील अशी माहिती  चिपळूण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून  प्राप्त झाली आहे. 

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मधील इयत्ता पहिली मध्ये १३७१विद्यार्थी,  दुसरीमध्ये १४७१, तिसरी मध्ये १५८८ विद्यार्थी,  चौथी मध्ये १७०९,  पाचवी मध्ये १८२८,  सहावी मध्ये २४५८, सातवी मध्ये २१७१ आणि  आठवी मध्ये २१३९ विद्यार्थी आहेत.  एकूण १४ हजार ७४८ विद्यार्थी आहेत तर उर्दू शाळेमध्ये इयत्ता पहिली मध्ये ८० दुसरीमध्ये ८० तिसरी ९५, चौथी ९२, पाचवी १२०,  सहावी  १४८,  सातवी १३४ आणि  आठवी १४१ असे ८९०  विद्यार्थी आहेत.  एकूण तालुक्यांमध्ये १५ हजार ६३१ विद्यार्थी असून त्यांना  मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. 

पहिल्याच दिवशी शाळेमध्ये नवीन कोरी पुस्तके मिळाल्यामुळे मुलांच्या मध्ये सुद्धा एक वेगळा आनंद चेहऱ्यावर दिसून येत होता. घरी गेल्यानंतर पालकांनी सुद्धा  पुस्तक मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे. एकंदरीत शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक देण्यामागील  उदात्त  हेतू सफल होत असताना दिसत आहे.  गरीब गरजू मुलांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ मिळाल्यामुळे त्यांच्या पालकांच्या डोक्यावरील मोठा खर्च कमी झालेला आहे. त्यामुळे पालक वर्गातून सुद्धा समाधान व्यक्त होत आहे.

Comments