चिपळूण येथे ट्रकच्या धडकेत बुलेट एसटीखाली; एक गंभीर
चिपळूण : शहरातील पाग पॉवर हाऊस नाका परिसरात काल मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात बुलेटस्वारांना ट्रकने धडक दिल्याने मागे बसलेला स्वार व बुलेट एसटी बसच्या पुढील चाकाखाली सापडले. अपघातात मागे बसलेला स्वार जखमी झाला. या अपघातामुळे काहीकाळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सारस्वत बँकेचे कर्मचारी श्री. महाडिक आणि वॉचमन श्री. चव्हाण हे बुलेटवरून चिपळूणहून सावर्डेच्या दिशेने जात होते. त्याचवेळी पाग पॉवर हाऊस नाका येथे मुंबईहून रत्नागिरीकडे जाणारी एसटी बस (क्र. एमएच १४ बीटी २५२४)च्या पुढे जात असताना मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकचालकाने ट्रक (क्र. एमएच ४३ सीक्यू ६१४२) ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना ट्रकची बुलेटला जोरदार धडक बसली. धडकेच्या तीव्रतेमुळे बुलेट ट्रक ऑणि एसटी बसच्या चाकाखाली अडकली. यावेळी बुलेटवरील मागे बसलेले श्री. चव्हाण हे एसटीच्या पुढील चाकाखाली आल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे हलवले. श्री. महाडिक हेही या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. संतप्त नागरिकांनी ट्रकचालकाला चांगलाच प्रसाद दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून काही वेळानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Comments
Post a Comment