चिपळूण तालुक्यातील शेतकरी वरुण राजाच्या प्रतीक्षेत
भात पेरणीची कामे पूर्ण ; मृग नक्षत्र सुरू
चिपळूण : तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण करून आता मृग नक्षत्रातील पावसाची वाट बघत आहे. कोकणात रोहिणी नक्षत्र सुरू झाले की पेरणीला सुरुवात होते. पारंपारिक पद्धतीने बळीराजांनी भात, नाचणी, आणि वरीची पेरणी करून आता बळीराजा वरूण राजाच्या प्रतीक्षेत आहे.
कोकणातील विशेषता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये शेतीची मशागत करून झाल्यानंतर पेरणी केली जाते. पाऊस पडण्याच्या आधी रोहिणी नक्षत्रामध्ये पिकाची पेरणी केली जाते. दिनांक २५ मे पासून रोहिणी नक्षत्र सुरू झाले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील पेरणी आटपून घेतली आहे. कारण ज्या ठिकाणी पाण्याची शेती आहे त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडल्यास ओल्याने पेरणी करता येत नाही. म्हणून पारंपारिक पद्धतीने सुकी जमीन असताना शेतकरी पेरणी करून घेतो.
चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात, नाचणी आणि वरी या पिकांची पेरणी केलेली आहे. मात्र पेरणी करून बरेच दिवस गेले तरी पाऊस पडलेला नाही. दिनांक ८ जून पासून मृग नक्षत्र सुरू झाले असून त्याचे वाहन बेडूक आहे. बेडूक वाहन म्हटलं की भरपूर पाऊस पडतो अशी पूर्वीच्या लोकांची समज आहे. मात्र अजून ग्रामीण भागामध्ये व तसा पाऊस पडलेला नाही. पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिलेले आहे. मृग नक्षत्रामध्ये दमदार पाऊस पडला तर निश्चितच शेतीच्या कामांना वेग येईल. शेतकरी पाऊस पडताच शेत नांगरणीला सुरुवात करेल आणि पुढची कामे पटापट होतील.
मात्र वरुणराजाचे आगमन कधी होणार या प्रतीक्षेत बळीराजा डोळे लावून बसलेला आहे. शेतकरी वर्षभर शेतीसाठी झटत असतो. त्यामुळे पेरणी, भात लावणी आणि भात कापणी अशा तीन टप्प्यामध्ये शेतकरी शेतीचे काम या हंगामात पूर्ण करीत असतो. घाटावरील शेतकरी आणि कोकणातील शेतकरी यांच्यामध्ये जमीन खूपच फरक आहे. कोकणामध्ये वर्षातून एकच पीक शेतीच्या माध्यमातून पिकवले जाते. त्यामुळे ही शेती पावसावरती अवलंबून असते. यातच आता शेतकऱ्यांकडे बैल जोड्या किंवा गुरढोर कमी झाली आहेत. त्यामुळे बैल नांगरजोडी ऐवजी आता पॉवर ट्रिलरचा वापर शेतकरी नागरणीसाठी करू लागलेला आहे. पण या सर्व प्रक्रियेमध्ये पाऊस पडणं ही महत्त्वाची बाब आहे.
चिपळूण तालुक्यातील शेतीचा विचार होता भात व नाचणी ही दोन पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. सध्या कृषी खात्याकडून शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाची शेती करण्याबाबत सुद्धा मार्गदर्शन केले जात आहे. यामुळे काही प्रगतशील शेतकरी उदयास येत आहेत. मात्र आता बळीराजा पाऊस कधी पडणार या चिंतेत आहे.

Comments
Post a Comment