भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उद्या रत्नागिरी दौऱ्यावर

 पदाधिकारी बैठक, कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन 


 रत्नागिरी :  भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण हे बुधवार, दि. १७ जून २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे.

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असून यासाठी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रत्नागिरी शहरात उत्तर व दक्षिण जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावाही आयोजित करण्यात आला आहे.

दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणाऱ्या उत्तर व दक्षिण जिल्हा पदाधिकारी बैठकीने होणार आहे. सकाळी १० ते ११ या वेळेत ही बैठक पार पडणार असून संघटनात्मक विषयांवर चर्चा होणार आहे.

त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत उत्तर व दक्षिण जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून आगामी राजकीय वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण दिशा देणार आहेत.

दुपारी १२ ते १.३० या वेळेत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुपारी १.३० नंतरची वेळ राखीव ठेवण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्षांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील भाजप संघटनेला अधिक बळ मिळणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Comments