अलोरेच्या दिव्या चिपळूणकरची मिसेस महाराष्ट्र स्पर्धेत बाजी


सेकंड रनर अप' किताबावर नाव कोरले; पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव


चिपळूण :  तालुक्यातील अलोरे गावची सुकन्या दिव्या देवदास चिपळूणकर हिने मिसेस महाराष्ट्र २०२६ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सेकंड रनर अप हा मानाचा किताब पटकावला आहे. तिच्या या यशामुळे अलोरेसह संपूर्ण चिपळूण तालुक्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल झाले आहे.

दिव्या चिपळूणकर हिने बालपणापासूनच नृत्य आणि मॉडेलिंग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. विविध राज्यस्तरीय नृत्यस्पर्धा व मॉडेलिंग स्पर्धांमध्ये तिने प्रथम क्रमांकाची अनेक पारितोषिके मिळवली आहेत. विवाहानंतर पेण येथील शहा परिवारात संसाराची जबाबदारी सांभाळत असतानाच तिने कंटेंट क्रिएटर म्हणूनही आपले काम सुरू ठेवले. पाच वर्षांच्या मुलाचा सांभाळ करत अनेक नामांकित ब्रँडसाठी तिने सर्जनशील डिजिटल कंटेंट तयार केला.

विवाहानंतर तब्बल बारा वर्षांनी तिने पुन्हा एकदा आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आणि नवी मुंबई येथे आयोजित मिसेस महाराष्ट्र २०२६ स्पर्धेत सहभागी होत सेकंड रनर अपचा किताब पटकावला.

जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे दिव्या चिपळूणकर यांच्या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अलोरे पंचक्रोशीतील नागरिक, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Comments