कोकणच्या मातीतील पारंपरिक जाखडी नृत्याचा पुन्हा बहरलेला गंध
जुनं ते सोनं हेच रसिकांना भावले
शक्तीतुरा कलेपेक्षा जाखडीच्या प्रेमात रसिक
संतोष कुळे चिपळूण
कोकणात शक्ती तुरा ही लोककला प्रसिद्ध आहे. पूर्वी या कलेचे रसिक दिवाणे होते. मात्र आता शक्ती तुरा कलेत वाढलेला अश्लीतेचे प्रमाण, वाद्यांचा अती वापर, एकमेकांची उणी धुणी काढणे या साऱ्या गोष्टींमुळे रसिक शक्ति तुरा कलेपासून थोडा दुरावत आहे. मात्र सध्या याच कलेची दुसरी बाजू म्हणजे पारंपारिक जाखडी कलेच्या प्रेमात रसिक पडले असून सध्या जाखडी कला रसिकांच्या पसंतीला उतरली आहे. कोकणच्या मातीतील जाखडी नृत्याचा पुन्हा बहरलेला गंध आहे. यातूनच जुने ते सोने हेच पुढे येत आहे.
शक्ती तुरा कलेमध्ये मोठे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ही कला आता मुंबईसारख्या मोठ्या रंगमंचावर सुद्धा सादर होते. मात्र पूर्वीचा ग्रामीण भागातील गोडवा या कलेला राहिलेला नाही. त्यामुळे रसिक सुद्धा या कलेपासून थोडा दूर जाताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे पारंपारिक जी जाखडी नृत्यकला होती ती आता काही गावातून आपल्याला पुन्हा जिवंत झालेली दिसते. त्यामध्ये चांगले बदल केल्याने ही जाखडी नृत्यकला रसिकांच्या पसंतीस पडत आहे. या जाखडीमध्ये खरंतर चांगले सादरीकरण आणि शाहीर चांगलं गाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
जाखडी हे केवळ नृत्य नसून ते कोकणच्या ग्रामीण संस्कृतीचे सामूहिक एकतेचे व समृद्ध लोक साहित्याचे जिवंत प्रतीक आहे. त्यामुळे जाखडी कलेला चिपळूण तालुका आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चिपळूण मधील खेरशेत भाटलेवाडी येथे प्रथम या जाखडी सादरीकरणाला सुरुवात केली. त्यानंतर आता चिपळूण तालुक्यामध्ये आगवे, मांडकी, सावर्डे, खेरशेत अशा अनेक गावातून जाखडी नृत्य कला सादर होताना दिसत आहे. या कलेला रसिकांकडून चांगली पसंती मिळत आहे.
गणपती आणि नवरात्राच्या सणांमध्ये जाखडी लोककलेला आयोजकांची मागणी असते. या जाखडी कलेमध्ये शक्ती तुरा सारखी पारंपारिक वेशभूषा केलेली असते आणि मध्यभागी ढोलकी वाजवणारा शाहीर पुरुष उभा असतो. याच्यातील लयबद्धता अतिशय महत्वाची आहे. नर्तकाच्या वेगाने होणाऱ्या गिरक्या, पदन्यास हातांच्या हालचाली यातून एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. हे सादरीकरण करत असताना शक्ती तुरा कलेप्रमाणे स्तवन, गण, गवळण आणि पौराणिक कथेवरील आधारित पद हाच पद्धत असली तरीसुद्धा यामध्ये गवळण दाखवताना काही सोंगे आणली जातात. त्या गीताप्रमाणे कथेतील सोंगे दाखवायचा प्रयत्न जाखडी मध्ये केला जात आहे. गवळणी मध्ये श्रीकृष्ण, राधा, पेंद्या यांचं आगमन होते आणि रसिकांना ते फार भावत आहे.
त्याचबरोबर पौराणिक गीत ज्या कथेवरती आहे. त्या कथेतील सोंगे या ठिकाणी सादर होतात. उदाहरणार्थ श्रावण बाळाचे गीत असेल तर प्रत्यक्ष श्रावण बाळ दाखवला जातो. त्यानंतर तो आपल्या आई-वडिलांना कावडमधून खांद्यावर घेऊन जाताना सुद्धा दाखवले जाते. त्यामुळे ही कला बघताना रसिक अगदी भारावून जातात. गणामध्ये सुद्धा काही सोंगे दाखवली जातात. यामुळे ही जाखडी लोककला रसिकांच्या आवडीची ठरत आहे.
मात्र या उलट शक्तीतुऱ्यामध्ये आपल्याला गवळणी पासून पुढे अश्लील बोलणे आणि लज्जास्पद शब्द ऐकायला मिळतात. जर तुरेवाला पुरुष आणि शक्तिवाली महिला असेल आणि त्यांचा जुगल बंदीचा सामना असेल तर कानावरती हात ठेवावे लागतात. एवढ्या पुढे शक्ती तुरा गेल्यामुळे थोडा रसिक तिकडे दुर्लक्ष करताना दिसतो. मात्र, जाखडी कलेमध्ये तसं काही पाहायला मिळत नाही. उलट या कलेला आता आयोजकांकडून कार्यक्रमाची मागणी वाढत आहे.
कोकणातील परदेशात गेलेल्या लोकांनी सुद्धा या जाखडीला जपून ठेवले आहे. मॉरिस सारख्या देशात या जाखडीला "झाकरी " या नावाने ओळखले जाते. त्यामुळे जाखडी नृत्यकला आता नवीन पद्धती मध्ये पुढे येताना दिसते. यामध्ये नाचणारे मुले छोटे बालक नसून वयस्कर लोक असतात. आणि ते अतिशय सुंदर असं तालबद्ध आणि ठेक्यावर नृत्य करतात. त्यामुळे एक वेगळीच झलक आपल्याला पाहायला मिळते. एकसारखी वेशभूषा, मृदुंगावरती वादन आणि ठेक्यामधील नृत्य यामुळे जाखडी कलेकडे रसिक प्रेक्षक मोठ्या प्रमाणात वळत आहे.
पारंपरिक जाखडीचा आविष्कार रसिकांना भावला
जाखडी नृत्य कलेतून लोकांचे उत्तम प्रकारे मनोज मनोरंजन होते. यामध्ये कोणत्याही प्रकारची चढाओढ नसून एक निखळ असे सादरीकरण केले जाते. जाखडीमध्ये स्तवन, गण, गवळण, पौराणिक कथेवरती पद या पद्धतीने सादरीकरण करताना संबंधित गीताप्रमाणे काही सोंगेही आणून रसिकांचे मनोरंजन केले जाते. आपल्या संस्कृतीचे दर्शन या जाखडीतून घडते. जाखडी आता नव्या ढंगांमध्ये रसिकांना आवडत आहे. असल्याचे वाघजाई देवी जाखडी नृत्य मंडळ आगवे हुमणेवाडी येथील शाहीर संदीप हुमणे आणि सुरज हुमणे यांनी सांगितले.
शाहीर संदीप हुमणे सह सूरज हुमणे
वाघजाई जाखडी नृत्य मंडळ आगवे हुमणेवाडी चिपळूण


Comments
Post a Comment