लोककलेच्या प्रांगणातील पहाडी सूर म्हणजे लोकाभिमुख लोकशाहीर पिंट्या भालेकर
लोकसंस्कृतीतील नमन कला जपणारा अवलिया
नमन कलेचा " सह्याद्री" प्रवास पिंट्या भालेकर
संतोष कुळे
चिपळूण : प्रत्येक व्यक्तीची आवड आणि छंद वेगवेगळे असतात. मात्र, अशा छंद वेड्या व्यक्ती आपली आवड जपताना अगदी मनापासून समरस होत कार्य करतात. अशाच व्यक्तींपैकी लोककलेच्या प्रांगणात गेली अनेक वर्षे नमन या कलेतून रसिकांची सेवा करणारा लोकाभिमुख लोकशाहीर कलावंत म्हणजे प्रदीप उर्फ पिंट्या भालेकर होय.
देवरुख पाटगाव येथील पिंट्या भालेकर यांनी आपला संसाराचा रथ हाकताना त्याने समर्पक भावनेने लोककला जोपासण्याचे कार्य हाती घेतले. मुळातच त्यांचा मधुर पहाडी आवाज असल्याने भालेकर यांच्या आवाजाचे रसिक चाहते झाले. लोककला आणि लोकसंगीत अशा कलेला त्यांनी स्वतःची आवड आणि छंद बनवले. गेली कित्येक वर्षे शाहीर पिंट्या भालेकर हे नमन कलेच्या माध्यमातून रसिकांची मनोरंजनातून प्रबोधन करत सेवा करत आहेत.
देवरुख मधील श्री सह्याद्री मार्लेश्वर नमन कलामंच स्थापन करून त्यांनी कोकणची बहुरंगी आणि बहुढंगी असलेली नमन कला जोपासली आहे. अतिशय प्रेमळ स्वभाव आणि गोड स्वर यामुळे पिंट्या भालेकर यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या आवाजात पोवाडा ऐकताना अगदी इतिहासात गेल्यासारखे वाटते. त्यांच्या नमन कलेच्या माध्यमातून गायलेला हृदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांचा पोवाडा आजही रसिकांच्या मनात कायम आहे.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून श्री भालेकर यांनी नमन कलेचे कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या सादरीकरणात एक वेगळेपण असते. त्यांनी बहीण भावाच्या अतूट नात्याला स्पर्श करणारे प्रहसन सादर करून स्वतःमधील गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यांनी नमन कलेतून संत परंपरेचा इतिहास उलगडण्याचे कार्य ही केले आहे. त्यांनी अनेक कलाकारांना श्री सह्याद्री मार्लेश्वर नमन कलामंच या समूहात घेऊन नावारूपाला आणले आहे. वेगवेगळ्या गावातील कलावंताना एकत्रित करून एक कलवंतांचा संच उभा करणे आणि तो सतत चालविणे हे आजच्या काळात सोपे काम नाही आहे. मात्र, ही किमया त्यांनी केली आहे.
स्वतःचा प्रपंच सांभाळत श्री भालेकर यांनी हा लोककलेचा बहुरंगी रथ पुढे नेण्याचे काम करत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील हे खास व्यक्तिमत्व असून कलेच्या प्रांगणात शाहीर पिंट्या भालेकर हे नाव आदराने घेतले जाते. कारण समता आणि बंधुत्व हे गुण त्यांच्या स्वभावात आहेत.
गेली अनेक वर्षे ग्रामीण आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरात नमन कला सादर करून समाजप्रबोधन करण्याचे काम त्यांनी केले आहे. अशा या कलावंताला कलेची सेवा करण्यासाठी सुखी आयुष्य लाभो अशी कामना रसिक करत आहेत.

💐💐🚩अनेक वर्षे आपल्या आवाजाने नमन कलेमध्ये नाव केले आहे 👍💐अभिनंदन
ReplyDelete