मुसळधार पावसात पाग मराठी शाळेजवळ कोसळले झाड 

नगर परिषदेकडून तातडीने हटविण्याची कार्यवाही


चिपळूण :  शहरात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे पाग मराठी शाळेजवळील  मोठे झाड अचानक मुख्य रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. झाड रस्त्यामध्येच पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्यामुळे नागरिकांची कोंडी झाली होती. मात्र नगर परिषदेने तातडीने कारवाई करत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

 झाड कोसळल्याची घटना घडताच शिवसेना विभागप्रमुख संदेश गोरीवले यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून तातडीने चिपळूण नगर परिषदेचे बांधकाम सभापती कपिल  शिर्के यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच वेळेचे गांभीर्य ओळखून बांधकाम सभापती श्री. शिर्के यांनी कोणताही विलंब न करता नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह थेट घटनास्थळी धाव घेतली.

बांधकाम सभापतींच्या थेट उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी कोसळलेले झाड कापून रस्त्यावरून बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. या मदत कार्या दरम्यान स्थानिक नागरिकांनीही केवळ प्रेक्षक न राहता उत्स्फूर्तपणे पुढे येत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोलाचे सहकार्य केले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे काही वेळातच झाड पूर्णपणे हटवून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत सुरळीत करण्यात आला.

पाऊस आणि वाऱ्याचा जोर कायम असतानाही संबंधित यंत्रणेने आणि लोकप्रतिनिधींनी वेळेत धाव घेऊन केलेल्या तत्पर कार्यवाहीमुळे पुढील मोठा संभाव्य धोका टळला. पाग परिसरातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासन, बांधकाम सभापती आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या या तत्परतेबद्दल तीव्र समाधान व्यक्त केले आहे.

Comments