शेती शिवारातून बैलजोडी हद्दपार

 गुरांचे गोठे झाले रिकामे, शेती अवजारे शोभेची वस्तू

​

संग्रहित फोटो 

​चिपळूण : पूर्वीच्या काळी मुलीचे लग्न जमवताना नवरदेवाच्या घरी असलेल्या बैलजोड्यांच्या संख्येवरून त्याची श्रीमंती मोजली जात असे. ज्याच्या गोठ्यात चार-पाच जोती बैल, तो मोठा बागायतदार समजला जाई. मात्र, आजच्या काळात पैशाने श्रीमंत असलेल्या शेतकऱ्यांच्या गोठ्यातही दोन बैलांची जोडी दिसेनाशी झाली आहे. पारंपरिक शेतीची ओळख असलेली बैलजोडी आणि लाकडी नांगर आता केवळ पुस्तकातच पाहायला मिळतील की काय, अशी भीती ग्रामीण भागात व्यक्त होत आहे.

​बैलजोडीचा वाढता खर्च आणि यांत्रिकीकरणाचा विळखा

कोकणातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. पूर्वी नांगरणी, चिखलणी, मळणी आणि मालवाहतुकीसाठी बैलजोडी हा शेतकऱ्याचा मुख्य आधार होता. मात्र, बैलजोड्यांच्या गगनाला भिडलेल्या किमती, वर्षभराचा पालनपोषणाचा खर्च आणि शेतीसाठी लागणाऱ्या मजुरांची टंचाई यामुळे बैलजोडी राखणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. खते, बियाणे आणि औषधांच्या वाढत्या महागाईत, बैलजोडी परवडत नसल्याने शेतकरी आता ट्रॅक्टर किंवा पॉवर ट्रीलरसारख्या आधुनिक यंत्रांकडे वळला आहे. यामुळेच शेतातून बैलांना हाक मारतानाचा 'हिरी..री.. पापारीचा' तो पारंपारिक आवाज आता कालबाह्य ठरून तिथे यांत्रिकीकरणाचा आवाज घुमू लागला आहे.

​गोठे झाले 'खुराडे', तरुणाईची शेतीकडे पाठ

शेती आणि जनावरे हीच खरी संपत्ती मानणारी पिढी आता कमी होत चालली आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे शहराकडे होणारे स्थलांतर आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जनावरांच्या देखभालीचा प्रश्न बिकट झाला आहे. आजच्या तरुण पिढीला शेती आणि पशुपालन हे कष्टाचे किंवा कमीपणाचे वाटू लागल्याने, अनेक शेतकरी आर्थिक किंवा वेळेच्या अभावी जनावरे विकून टाकत आहेत. परिणामी, एकेकाळी जनावरांच्या गळ्यातील घंटांनी गुंजणारे गोठे आता ओस पडले असून त्यांचे रूपांतर 'खुराड्यांत' झाले आहे.

​लाकडी अवजारे कालबाह्य

बैलजोडीसोबतच पारंपारिक लाकडी नांगर, ईशाड, लुमनी रुमडी,  फाळ यांसारखी लाकडी अवजारेही आता कालबाह्य होऊ लागली आहेत. ही अवजारे तयार करणारे कारागीर आणि ती वापरणारे शेतकरी दोन्ही दुर्मिळ होत आहेत.

​शेतकऱ्यांची व्यथा

याबाबत मुरडव येथील शेतकरी प्रकाश मेणे म्हणतात, "ट्रॅक्टरच्या सहाय्याने कमी वेळेत शेतीची कामे होत असली आणि खर्च कमी वाटत असला, तरी बैलजोडी जुंपून केलेल्या शेतीतून जे आत्मिक समाधान मिळायचे, ते आजच्या यांत्रिकीकरणात मिळत नाही. आम्हाला बैलजोडीची आवड आहे, परंतु ती आजच्या महागाईत खिशाला परवडणारी राहिलेली नाही."

Comments