...अन्यथा भीक मागो आंदोलन करून निधीचे गाठोडे गळ्यात बांधू
मनसेचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांचा सा.बां आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा
चिपळूण : काय करायचे ते करा पण राष्ट्रीय महामार्गाची लक्तरे वेशीवर टांगू नका... सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी गुहागर विजापूर मार्गावर करोडो रुपयांची उधळण करूनही जर रस्त्यावर खड्डेच खड्डे असतील तर हे पैसे गेले कुठे? निधी लाटून झाला असेल आणि खड्डे भरायला जर निधी नसेल तर भीक मागून पैसे देऊ, आठ दिवसात जर खड्डे भरले नाहीत तर शेकडो कार्यकर्ते दि. २० जुलै रोजी भीक मागो आंदोलन करून निधीचे गाठोडे गळ्यात बांधण्याचा इशारा मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी दिला.
राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणारा गुहागर-विजापूर मार्गावर बहादूरशेख ते कुंभार्ली घाट रस्त्याची अत्यंत्य दयनीय अवस्था झाली आहे. प्रचंड खड्डे आणि जागोजागी कॉक्रीटची कोसळणारी गटारे त्यातून तुंबणारे पाणी याने रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. तर या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडून करोडो रुपयांचा निधी खर्च झाला आहे. या संदर्भात आज मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाधक्ष राजू खेतले यांच्यासह मनसैनिक पप्पू आंब्रे, गणेश खेडेकर, मिलिंद कदम, राजेंद्र गोंजारी, आबा हटकर, विनोद चिपळूणकर, मंगेश महाडिक, उमेश पवार, सुनील मोडक, चांद शहा, मुस्ताकिन चांद शहा, सुलेआम शेख, भाई सुर्वे आदीसह कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. बहादूरशेख ते पिंपळी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ताब्यात होता. तर त्या पुढे कुंभार्ली घाटगापर्यंतचा रस्ता सहा महिन्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम कडून राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाला आहे. यावर दोन्ही विभागाने करोडो रुपयांचा निधी खर्च केला आहे.
या संदर्भात आज राजू खेतले यांनी उपअभियंता श्री. मुल्ला आणि शाम खुणेकर यांना जाब विचारला. यावेळी झालेल्या चर्चेनंतर मनसेचे वाहतूक जिल्हाधक्ष राजू खेतले यांनी आम्हाला निधीचा हिशोब नको आणि काही नको. ठेकेदारांना कळ्या यादीत टाकण्यासंदर्भात पाठवलेले पत्र ही दाखवू नका, आम्हाला यामध्ये कोणताही रस नाही. आम्हाला रस्ता सुस्थितीत पाहिजे आहे. जो पर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नाही तो पर्यंत बाजूची साफसफाई केली जात आहे, ती करू देणार नाही. अगोदर खड्डे भरा नंतर ही कामे करा. ठेकेदाराचे पोट भरण्यासाठी कामे काढून रस्त्याची वाट लावू नका. सोमवार पर्यंत या मार्गावर असणारे खड्डे बुजवा अन्यथा येत्या सोमवारी २० जुलै रोजी शहरात आणि ग्रामीण भागात मनसैनिक भीक मागो आंदोलन करून निधीचे गाठोडे गळ्यात बाधू, असा इशारा आज मनसेचे वाहतूक जिल्हाधक्ष राजू खेतले यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिला असून सोमवारी भीक मांगो आंदोलन करून पैसा संबंधिताना देऊ, असा इशारा दिला आहे.

Comments
Post a Comment