चिपळूण पंचायत समितीचे मासिक सभा म्हणजे "तू मारल्यासारखे कर.. मी रडल्यासारखे करतो..

अधिकाऱ्यांच्या दांडीबहाद्दर वृत्तीवर सदस्यांचा संताप

सभेत अधिकारी देतात थातुर मातुर उत्तरे


चिपळूण  : चिपळूण पंचायत समितीची पाचवी मासिक सभा शुक्रवार १७ रोजी पार पडली. परंतु आता पर्यंत झालेल्या मासिक सभा म्हणजे फक्त सदस्यांनी बेंबीच्या देठापासून बोलत सभागृहात नागरिकांच्या समस्या मांडायच्या आणि त्याला अधिकारी वर्गाने वाटण्याच्या अक्षता लावायच्या असाच कारभार दिसून येतो. कधीच एकदा ठराव झाला आणि त्याची कारवाई पुढच्या मासिक सभेच्या आता झाली असे झाले नाही. यावरून असे दिसते की सदस्यांचा वचक कमी झाला की सभापती यांची कमकुवत भूमिका नेमके काय समजायचे. मात्र " तू मारल्यासारखे कर..मी रडल्यासारखे करतो" असे पंचायत समितीच्या  मासिक सभेतील वातावरण दिसते.

चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा शिक्षक पतपेढी संघाच्या सभागृहामध्ये सभापती सूर्यकांत खेतले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  यावेळी उपसभापती संदेश आयरे आणि गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील उपस्थित होते. पंचायत समितीची मासिक सभा म्हणजे फक्त प्रत्येक खात्याचा आढावा घेताना खात्याचे अधिकारी येतात थातूरमातूर उत्तर देतात आणि निघून जातात. ठोस उत्तरे आणि कृतीमधील कारवाई होताना कधीच दिसली नाही.  त्यामुळे  अजूनही सदस्य आणि अधिकारी यांच्यातील कारभाराचा समन्वयक दिसून येत नाही.  

सदस्य नेहमीच सभागृहात पोटतिडकीने   समस्या मांडतात. मात्र त्याची कारवाई किती होते हा तर संशोधनाचा विषय ठरतो. यावर सभापती यांचीही भूमिका तेवढीच महत्वपूर्ण ठरते.  कित्येक खात्याचे अधिकारी  मासिक सभेला अनुपस्थित राहतात . याबाबत पहिल्याच   मासिक सभेत निर्णय झाला की,  सर्व विभागाच्या  अधिकाऱ्यांनी मासिक सभेला हजर राहायला पाहिजे.  मात्र तरीसुद्धा अधिकारी या मासिक सभेत अनुपस्थित असतात. काही अधिकारी आपल्या कार्यालयातील हाताखालील कर्मचाऱ्याला पाठवतात आणि स्वतः मात्र अंग काढतात. अशावेळी त्यांच्यावर कधीच कारवाई होताना दिसत नाही. सदस्य शौकत माखजनकर  आणि सुभाष जाधव हे नेहमीच सभागृहात याबाबत विषय मांडतात. परंतु, तेवढ्या पुरते विषय घेत "पुन्हा येरे माझ्या मागल्या" हीच स्थिती दिसते. महसूल विभागाचे अधिकारी   तीन मासिक सभेला गैरहजर होते आणि पाचव्या सभेला उपस्थित झाल्यानंतर सभागृहात सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. मग हे तीन सभेला का नाही आले यावर सभा अध्यक्ष यांनी काहीच ॲक्शन  घेतली नाही. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेताना सदस्य शौकत माखजनकर यांनी विचारले की, तुमचे मुख्य अधिकारी कुठे आहेत. त्यावर आढावा देण्यासाठी जे तिघेजण उपस्थित  होते त्यांनी थातूरमातूर उत्तरे दिली आणि आढावा सुरू झाला. यावेळी श्री माखजनकर यांनी डेरवण  रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अपघात होतात. ते  खड्डे का भरले नाहीत.  यावर दोन दिवसात खड्डे भरू असे सांगितले. पण प्रश्न हा आहे की, आता पाऊस सुरू असताना पावसात खड्डे भरून ते किती दिवस राहणार. मग १५ दिवस पाऊस नव्हता तेव्हा हे अधिकारी कुठे गेले होते. असा सवाल पुढे येत आहे.  

 त्यानंतर संजय जावळे यांनी   रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडी झुडपे तोडली नाही तर अपघात होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे ती कधी तोडणार.  मात्र हाच धागा पकडत सदस्य सुभाष जाधव यांनी कठोरपणे या विषयाचे गांभीर्य   सभागृहाच्या लक्षात  आणून देताना सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे भरण्यासाठी आणि झाडी तोडण्यासाठी कोटीची उड्डाणे असलेले बजेट दाखवतात. मग ते खर्च कुठे होतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 17 लाखाचे बजेट खड्डे आणि झाडी तोडण्यासाठी केलेले होते.   मग कुठल्या ठिकाणी झाडी तोडणे आणि खड्डे भरले याची माहिती सभागृहाला द्या.  सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा देण्यासाठी तीन अधिकारी उपस्थित होते. त्यांना सुभाष जाधव यांनी ठणकावून सांगितले की,  आगामी  काही दिवसांवरती कोकणातील महत्त्वाचा सण गणेशोत्सव येत आहे.  यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावाला येतात. अनेक लोक ग्रामीण भागातून प्रवास करतात. त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा. ते आनंदाने यावे आणि त्यांनी आनंदाने परत जावे. यासाठी अधिकारी यांनी रस्त्यांच्या समस्या आधीच सोडवण्याचे काम करावे.   जर कुठल्याही प्रकाराच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे किंवा वाढलेल्या झाडीमुळे   अपघात होताना आढळल्यास तुमच्यावरती ठोस कारवाई करू आणि वेळ आल्यास मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल करू असे ठणकावून सांगितले. याला सदस्यांनी  पाठिंबा दिला.  आता अधिकारी काय करतात याकडे लक्ष राहणार आहे. 

एस टी महामंडळाचा आढावा घेताना अनेक गाड्या गळक्या आहेत. प्रवाशांना त्रास होतो. असे सदस्य गौरव पाटेकर आणि सुभाष जाधव यांनी मुद्दा उपस्थिती केला. सदस्या सुप्रिया वंजारे यांनी चिपळूण गुढे गाडी गळती प्रश्न आणि कलमुंडी हायस्कूल विद्यार्थ्यांना एस टी उशिरा येते. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय होऊन नये संध्याकाळी बोऱ्या गाडी येते ती वेळत सोडण्याची मागणी केली. संजय जावळे यांनी वीरबंदर गाडी गेले काही दिवस बंद आहे ती चालू करावी अशी सूचना केली. सदस्य गौरव पाटेकर यांनी कात्रोळीतुन मिलिंद विद्यालय येथे येणाऱ्या मुलांचा विषय मांडला. गाडी उशीरा येत. ती वेळेत सोडण्याची सूचना केली. यानंतर आरोग्य, पाणीपुरवठा अशा अनेक विभागाचा आढावा घेण्यात आला.

 सदस्य शरद शिगवण, विनोद झगडे, सदस्या सौ उज्वला घाग, सौ. इंगळे यांनी समस्या मांडल्या. आता त्यातील किती समस्या सोडवल्या जातील हे कुणीच सांगू शकत नाही.या सभेला सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

Comments