लांज्यात भटक्या कुत्र्यांचा बालिकेवर हल्ला
चार वर्षीय चिमुकली गंभीर जखमी
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
लांजा : शहरातील सार्दळवाडी येथे रविवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास भटक्या कुत्र्यांच्या कळपाने चार वर्षीय चिमुकलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत बालिका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ती मुलगी ही आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना अचानक आठ ते दहा भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर झडप घातली. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांना हुसकावून लावत बालिकेची सुटका केली.
जखमी अवस्थेतील त्या मुलीला तातडीने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांकडून आवश्यक उपचार केले जात आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे लांजा शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशीमागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Comments
Post a Comment