कोकणच्या 'भजनी बारी'ची संस्कृती आजही अजरामर!

गणेशोत्सवात भक्तीचा अखंड होतो  जागर

 कोकणच्या मातीत भजन परंपरेचा नवा बहर!

​

                     संग्रहित 

​चिपळूण :  टाळ-मृदंगाचा ताल, हार्मोनियमचा सूर आणि त्यातून उमटणारा भक्तीची साद म्हणजे कोकणची समृद्ध 'भजन परंपरा'. गणेशोत्सवाच्या आगमनासोबतच कोकणातील प्रत्येक वाडी-वस्तीवर भजनी मंडळांची लगबग सुरू होते आणि पहाटेपर्यंत चालणाऱ्या 'भजनी बारी'च्या गजराने संपूर्ण आसमंत भक्तिमय होतो. काळाच्या ओघात आधुनिकतेची जोड मिळाली असली, तरी कोकणच्या मातीत भजनी  सांस्कृतिक ठेव्याने आपली मूळ सात्विकता आणि भक्तीची ओढ आजही तितक्याच निष्ठेने जपली आहे.

गणेशोत्सवाच्या महिनाभर आधीच भजनी मंडळांची लगबग सुरू होते. नवी गाणी, नवी बारी, नवे ठेके बसवले जातात. तबला-मृदंग सजवणाऱ्या कारागिरांकडे कामाची गर्दी वाढते. पूर्वी चतुर्थीच्या रात्री गॅस बत्तीच्या उजेडात टाळ-मृदंगासह भलीमोठी पायपेटी सांभाळत भजन कार्यक्रम रंगत असत.  आज कोकणातील जवळपास प्रत्येक वाडी-वस्तीवर भजनी मंडळ आढळते. अनुभवी जाणकारांचे मार्गदर्शन, तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या नामवंत बुवांच्या कॅसेट्स ऐकून भजनाच्या बार्‍या बसवल्या जातात.

काळाच्या ओघात काही काळ मागे पडलेली ही भजन परंपरा आता स्पर्धा, भजनी मेळे आणि व्यासपीठांमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. पूर्वी केवळ चतुर्थीपुरती मर्यादित असलेली भजनी बारी आता वर्षभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत रंग भरताना दिसते. भजन कलेला व्यावसायिक स्वरूप येऊ लागले असून भजन कलाकार संघटित होत आहेत, ही या कलेच्या वाटचालीतील महत्त्वाची पायरी मानली जाते.

चित्रपट संगीत काळानुसार बदलत गेले असले, तरी भजनाचा मूळ साचा आजही तसाच टिकून आहे. गण, स्तवन, रूपकातील गजर, अभंग, गौळण,  किंवा भारूड आणि शेवटचा गजर असा भजनाचा पारंपरिक क्रम अजूनही जपला जातो. गाणं म्हणणारा बुवा, मृदंगमणी, चक्कीवाला आणि कोरस अशी भजनी मंडळी ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजरात भक्तांना तल्लीन करून सोडतात. गजरात जसजशी रंगत वाढते, तसतसं भजन श्रोत्यांच्या मनात खोलवर उतरते.

भजन हे आनंदाच्या प्रसंगात जितके महत्त्वाचे, तितकेच दु:खातही. प्रसंगानुरूप त्याचे स्वरूप बदलते. चतुर्थीच्या भजनात गणेश-शंकराचे गाणे असते, वार्षिक मांडांवरील सदरेवर त्याच भजनाचा गजर ऐकू येतो. बारशाच्या वेळी अभंगाची जागा पाळण्याने घेतलेली असते, तर म्हाळाच्या वेळी गजर बदलतो. एखाद्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेत रामनामाच्या भजनात गाव एकत्र येते. काळानुसार लोकप्रिय झालेल्या चित्रपट गीतांच्या चालींचा प्रभाव काही भजनांवर दिसून येतो. मात्र बुजुर्ग भजन कलाकारांच्या मते, सात्त्विक भजनांना सुरेल आणि शुद्ध चालीच शोभून दिसतात.

भजनाची सुरुवात ‘कैलासराणा शिवचंद्र मौळी’ किंवा ‘सर्व मंगल मांगल्ये’सारख्या गणांनी होते. काही कल्पक बुवा स्तवनाच्या जागी सुरेल नोटेशन वापरून भजनाला नवे वळण देतात. ‘सुंदर ते ध्यान’, ‘रूप पाहता लोचनी’ यांसारख्या पारंपरिक अभंगांसोबतच नव्या रचनाही आता ऐकू येतात. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘नदी भरली चंद्रभागा’ यांसारख्या गजरांनी भजनाला उंची मिळते. तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्या अभंगांचा प्रभाव आजही सर्वाधिक दिसतो. त्यानंतर गौळणींमुळे भजनात शृंगाररसाची झलक येते आणि वाद्यांचा ठेका गाण्यांनुसार बदलत जातो.

कोकणात गणेशोत्सव काळात संध्याकाळी सातला सुरू झालेले भजनी मेळे पहाटे सहा वाजेपर्यंत रंगतात. तहान-भूक विसरून भाविक भक्तीत तल्लीन होतात. उसळ, बुंदीचे लाडू, आनंद आणि उत्साह यांचा संगम असलेल्या या सणामुळे कोकणची भजन परंपरा आजही तितक्याच ताकदीने टिकून आहे. भक्ती, संगीत आणि संस्कृती यांचा हा अनोखा संगम कोकणची ओळख जपत पुढील पिढीकडे सोपवत आहे.

Comments